पंचशीलच्या हातांनी केले उमेदवारांचे उदरभरण
By Admin | Updated: February 13, 2015 22:54 IST2015-02-13T22:24:44+5:302015-02-13T22:54:40+5:30
मोफत जेवण : हिंमत होवाळ यांचा देशसेवेचा अनोखा फंडा, हजारो उमेदवार झाले तृप्त

पंचशीलच्या हातांनी केले उमेदवारांचे उदरभरण
रत्नागिरी : डोळ्यात देशसेवेची स्वप्न तरळत असली तरी सध्या सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना बाहेर मिळेल ते खाऊन, मिळेल तिथे निद्रा घ्यावी लागत आहे. या उमेदवारांच्या अडचणीचा गैरफायदा अनेक व्यापारी, हॉटेलवाले घेत असले तरी पलूस (जि. सांगली) येथील हिंमत होवाळ आणि त्यांच्या पंचशील अॅकॅडमीचे शिक्षक या उमेदवारांसाठी सध्या अन्नदाते बनले आहेत. हिंमत होवाळ हे आर्मीतून निवृत्त झाले आहेत. आपली सेनादलात भरती व्हावी, यासाठी ते दोन वर्षे धडपडत होते. या काळात झालेल्या भरतीच्या वेळी ते स्वत: चार चार दिवस उपाशी राहिलेले आहेत. त्यामुळे या भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची व्यथा त्यांना माहीत आहे. सैनिक भरतीसाठी घेतले जाणारे प्रशिक्षण अतिशय खडतर असे असते. त्यामुळे देशसेवेसाठी स्वेच्छेने जाणाऱ्या उमेदवारांमध्ये ऐनवेळी आत्मविश्वास कमी पडतो. मात्र, या प्रशिक्षणाची त्यांना माहिती व्हावी, यासाठी सेवानिवृत्त झाल्यानंतर हिंमत होवाळ यांनी पलूस येथे पंचशील करिअर अॅकॅडमीची स्थापना केली आहे. यापेक्षाही त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे जिथे जिथे भरती होते, त्या ठिकाणी भरती संपेपर्यंत होवाळे अॅकॅडमीच्या खर्चातून भरतीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांना दोन वेळचे जेवण मोफत पुरवतात. गेल्या तीन वर्षांपासून ते हा उपक्रम राबवत आहेत. रत्नागिरीत ७ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्रातील सहा आणि गोव्यातील दोन जिल्ह्यांसाठी महाभरती सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या दिवशी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याठिकाणी दरदिवशी हजारोंच्या संख्येने उमेदवार येत आहेत, हे लक्षात घेऊन विविध फळविक्रेते, भाजीविक्रेते, खाद्यविक्रेते यांनी आपल्या वस्तूंचे दर भरमसाठ वाढवले आहेत. त्यामुळे या भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना प्रसंगी उपाशी राहावे लागते. मात्र, होवाळ यांच्यासह १५ जणांच्या चमूने या भरतीच्या ठिकाणी मोफत अन्नछत्र उघडले आहे. दुपारी साडेबारा ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, तर सायंकाळी ७ ते रात्री १२ नव्हे; तर अगदी दोन वाजेपर्यंत येथील उमेदवारांना जेवण देत आहेत. दोन्ही वेळेला सुमारे ६ ते ७ हजार उमेदवार मनसोक्त जेवत आहेत. केवळ भात - आमटीच नव्हे; तर भात, भाजी, आमटी, मसालेभात, जिरा राईस असे जेवण दिले जात आहे. उमेदवारांना याची माहिती व्हावी, या हेतूने मारूती मंदिर बसस्टॉपनजीक मोफत जेवणाचा फलकही लावण्यात आला आहे. उमेदवारांच्या मोफत जेवणासाठी पंचशील अॅकॅडमीतर्फे लाखो रुपयांचा खर्च होत आहे. दरदिवशी चार कंटेनर भरून पलूस येथून धान्य मागवले जात असले तरी उमेदवारांच्या वाढत्या संख्येनुसार काही वेळा तेही कमी पडते. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांकडून ते खरेदी करावे लागत आहे. या उपक्रमाला रत्नागिरी नगरपरिषदेनेही सहकार्य केले असून, होवाळ यांना जागेची तसेच पाण्याचीही सोय उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी)
मी जिथे जिथे भरतीला जात होतो. तिथे तिथे जेवणाची सोय नसल्याने भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे हाल होत होते. त्यामुळे सैन्यातून निवृत्त झाल्यावर विचार केला की, भरतीच्या ठिकाणी या मुलांच्या जेवणाची सोय केली तर देशसेवेचे समाधान मिळेल आणि या मुलांना जेवण पुरविल्याचे समाधानही मिळेल, हाच यामागचा हेतू आहे.
- हिंमत होवाळ, माजी सैनिक