पाली, लांजा, कणकवलीत उड्डाणपूल

By Admin | Updated: July 30, 2014 23:47 IST2014-07-30T23:46:15+5:302014-07-30T23:47:00+5:30

महामार्ग चौपदरीकरण : कामाला गती मिळण्याची आशा

Pali, Lanja, Kankavaliyala flyover | पाली, लांजा, कणकवलीत उड्डाणपूल

पाली, लांजा, कणकवलीत उड्डाणपूल

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाचे तातडीने चौपदरीकरण करतानाच कमीत कमी लोक बाधित व्हावेत, यासाठी पाली, लांजा आणि कणकवली येथे उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, केंद्रीय व राज्याच्या बांधकाम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली.
केंद्रीय बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुरुप सह्याद्री या शासकीय निवासस्थानी खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये दीर्घकाळापासून रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी शासकीय स्तरावर सर्व कामांना प्रारंभ होण्यासाठी गीतेंनी सूचना केली. तसेच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या चौपदरीकरणासाठी महामार्गात येणाऱ्या निवासी वसाहती तसेच बाजारपेठा वाचवण्याच्या अनुषंगाने सांगोपांग चर्चा झाली.
तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पाली, लांजा व सिंधुदुर्गातील कणकवली या महत्त्वपूर्ण बाजारपेठा या चौपदरीकरणातून वगळण्यासाठी मोठ्या स्वरुपाचे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या महामार्गादरम्यान कमीत कमी रहिवासी व व्यापारी बाधित होतील, याची काळजी घेताना जे रहिवासी व व्यापारी विस्थापित होतील, त्यांना केंद्राच्या नवीन धोरणानुसार मोबदला दिला जावा, अशी मागणी या बैठकीत विनायक राऊत यांनी यावेळी केली.
त्याचबरोबर प्रदीर्घ काळापासून चर्चेत असलेल्या व रखडलेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी हे काम एकाचवेळी ५ भागात चालू करावे, असा प्रस्ताव आहे. हे काम अधिकाधिक वेगात व कमीत कमी वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी हे काम किमान १० ते १२ भागात एकाचवेळी सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना उपस्थित लोकप्रतिनिधींकडून देण्यात आली. यावर चर्चा होऊन संबंधित यंत्रणेने त्वरित मान्यता दिली. बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, बांधकाम खात्याचे अधिकारी, कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Pali, Lanja, Kankavaliyala flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.