पाली परिसरात भातावर करपा रोग

By Admin | Updated: October 12, 2014 23:31 IST2014-10-12T22:45:45+5:302014-10-12T23:31:26+5:30

शेतकरी संकटात : खोडकिडीसह निळ्या भुंंगेऱ्याचे प्रमाण अधिक

Pala disease of Pali area | पाली परिसरात भातावर करपा रोग

पाली परिसरात भातावर करपा रोग

रत्नागिरी : पाली परिसरात उशिरा झालेल्या भात लावणीमुळे अद्याप तयार न झालेल्या भातपिकावर खोडकिडींसह निळे भुंगेरे, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे अखेरच्या टप्प्यात असलेल्या भातपिकाला त्याचा फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
सध्याच्या बदलत्या वातावरणात पाऊस लांबल्याने लावणीची कामे खोळंबली होती. त्यामुळे नियोजनाच्या एक महिना उशिरा भात लावणी झाल्याने ते परिपक्व होण्याचाही कालावधीही लांबला. पण, सध्या पंधरा दिवस पावसाने मारलेली दडी, बदलते मळभी वातावरण, यामुळे खोडकिडी, निळे भुंगेरे, करपा यांचा बहुतांश ठिकाणी प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे भाताच्या पातींवर बारीक ठिपके दिसणे, पाने वाळणे असे प्रकार आढळून येत आहेत. तसेच भाताच्या लोंबीही आता तयार झालेल्या असल्याने निळ्या भुंग्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तसेच काही ठिकाणी भातपिकावर भूरकट पांढऱ्या रंगाची अळीही पडलेली दिसत आहे. विविध रोग या ढगाळ आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे पडलेले आहेत. या करपा रोगावर संबंधित यंत्रणेने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
कृषी सहाय्यक प्रशिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. निवळी, चरवेली, नागलेवाडी, कापडगाव, पाली, साठरेबांबर, कशेळी, नाणीज आदी गावांमध्ये या रोगाची लागण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कृषी भागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन पीक वाचवण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pala disease of Pali area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.