रखडलेला पगार आॅफलाईन पद्धतीने होणार
By Admin | Updated: July 6, 2015 00:26 IST2015-07-05T21:38:19+5:302015-07-06T00:26:07+5:30
बैठकीत निर्णय : शिक्षण सभापतीनी शिष्टमंडळांच्या चर्चेप्रसंगी दिले आश्वासन

रखडलेला पगार आॅफलाईन पद्धतीने होणार
लांजा : रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा रखडलेला पगार आॅफलाईनने अदा करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांनी सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत दिली आहे.
सध्या प्राथमिक शिक्षकांचे पगार आॅनलाईन करण्याची प्रक्रिया राज्यात सुरु आहे. या प्रक्रियेद्वारे पगार आॅनलाईन करण्याच्या कामामध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे दरमहा एका तारखेला पगार होणे अपेक्षित असताना या प्रक्रियेमुळे उलट महिना-दीड महिना पगाराला विलंब होऊ लागला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.याबाबत सर्वच शिक्षक संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे लेखी निवेदने देऊन असंतोष व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांनी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोलकर तसेच जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेऊन जिल्ह्यातील शिक्षकांना लवकरात लवकर पगार देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यानुसार मे व जून महिन्याचा पगार आॅफलाईन पध्दतीने अनुक्रमे ७ व ८ जुलै व १५ जुलैपर्यंत अदा करण्यात येणार असल्याचे सांगितले.आता जिल्ह्यातील शिक्षकांना लवकरच पगार मिळण्याबाबतची कार्यवाही केली जाणार आहे. याबाबत भविष्यातही पगार नियमित करण्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत प्रा. फंड बिले, निवड श्रेणी व बी. एड. प्रवेश याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. दि. ८ जुलै पर्यंत पगार अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात हे पगार यावेळी होतात की नाही याकडे लक्ष लागले आहे.
यावेळी जिल्ह्यातील पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पावसकर, शिक्षक समितीचे सरचिटणीस दिलीप महाडिक, पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम मोरे, प्रकाश पाध्ये, उदय शिंदे, रुपेश जाधव, संजय डांगे, अरविंद वारे, अशोक भालेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)