चेन चाेरीप्रकरणी तपासात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पाेलिसांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST2021-09-17T04:38:40+5:302021-09-17T04:38:40+5:30
रत्नागिरी : जन आशीर्वाद यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन चेन चाेरी करणाऱ्या टाेळीला रत्नागिरीच्या पाेलिसांनी बीड येथून जेरबंद केले. याप्रकरणी ...

चेन चाेरीप्रकरणी तपासात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पाेलिसांचा सन्मान
रत्नागिरी : जन आशीर्वाद यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन चेन चाेरी करणाऱ्या टाेळीला रत्नागिरीच्या पाेलिसांनी बीड येथून जेरबंद केले. याप्रकरणी तपासात उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. माेहितकुमार गर्ग यांच्याहस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गाैरविण्यात आले.
रत्नागिरीत दाखल झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत चोरट्यांनी हात साफ करत चार जणांच्या गळ्यातील सोन्याच्या अडीच लाख रुपयांच्या चेन लांबवल्या हाेत्या. या प्रकरणाची पाळेमुळे खाेदून काढण्याचा चंग रत्नागिरी पाेलिसांनी बांधला हाेता. त्यानुसार पाेलिसांनी तपास यंत्रणा राबवली हाेती. याप्रकरणी सात संशयितांना बीडमधून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कारसह ४ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईत शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस हेडकाॅन्स्टेबल प्रसाद घोसाळे, पोलीस नाईक योगेश नार्वेकर, अमोल भोसले, राहुल घोरपडे, नंदकुमार सावंत, वैभव शिवलकर, मंदार मोहिते, कांबळे, रमीज शेख, आशिष भालेकर, पोलीस शिपाई निखिल माने, पोलीस हेडकाॅन्स्टेबल विजय आंबेकर यांनी कामगिरी फत्ते केली. या सर्वांचा डॉ. गर्ग यांनी सन्मान केला.