पाड्यांना मिळणार आता सकस खाद्य
By Admin | Updated: May 21, 2015 00:07 IST2015-05-20T22:06:08+5:302015-05-21T00:07:13+5:30
पशुसंवर्धन विभाग : ७५ लाखांची तरतूद

पाड्यांना मिळणार आता सकस खाद्य
रत्नागिरी : गोधन वाढ आणि दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी कपिला उत्कर्ष योजना राबवून गाय व म्हशींच्या पाड्यांना वयात येईपर्यंत १०० टक्के अनुदानातून सकस व संतुलित पशुखाद्य पुरवठा करण्यात येणार आहे.
शेतीला दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा असून, त्यावर कोकणात जास्त प्रमाणात लक्ष केंद्रीत केल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस मोठा हातभार लाभणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून पशुधन वाढीसाठी विविध योजनांची चांगल्या रितीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग विशेष प्रयत्नशील आहे.
जिल्ह्यात कपिला उत्कर्ष योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ७५ लाख रुपयांची तरतूद करुन त्याची मागणी जिल्हा नियोजन मंडळाकडे केली आहे. या योजनेअंतर्गत गाय आणि म्हशीच्या पाड्यांना ते वयात येईपर्यंत १२ हजार रुपये किमतीचे खाद्य १०० टक्के अनुदानावर पुरवले जाणार आहे.
त्याचबरोबर सुमारे १५०० रुपये किमतीचे क्षार मिश्रण व जीवनसत्त्वांचा पुरवठा केला जाणार असून, १५०० रुपये विम्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण १५ हजार रुपये एका पाड्यावर केले जाणार आहेत. त्यामुळे पाडे सुदृढ होण्यास मदत होणार असून, या योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाने आखणी सुरु केली आहे.
या योजनेचा लाभ देण्यासाठी गावोगावी गोपालकांचा गट तयार करुन गटनिहाय लाभधारकांची निवड केली जाणार आहे.
ही योजना तळागाळापर्यंत राबवता यावी, यासाठी महिला बचत गटांचा आधार घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांपर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचणार असून, त्याचा फायदाही चांगला घेता येणार आहे. (शहर वार्ताहर)
पशुधन वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्याला चांगल्या प्रकारे यशही येत आहे. त्याचप्रमाणे कपिला उत्कर्ष योजनेतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देण्यासाठी गोपालकांचे गट तयार करुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे सोयीचे ठरणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. सुभाष म्हस्के
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,
जिल्हा परिषद, रत्नागिरी.