कडवई येथे ऑक्सिजन बेड कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:32+5:302021-06-30T04:20:32+5:30
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई प्राथमिक केंद्र कडवई येथे जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांच्या प्रयत्नातून ग्रामस्थांच्या देणगीतून ऑक्सिजन ...

कडवई येथे ऑक्सिजन बेड कक्ष सुरू
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई प्राथमिक केंद्र कडवई येथे जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांच्या प्रयत्नातून ग्रामस्थांच्या देणगीतून ऑक्सिजन बेड कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन संतोष थेराडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा ऑक्सिजन बेड कक्ष पंचक्रोशीतील रुग्णासाठी जीवनदायी ठरेल, असे थेराडे यांनी सांगितले.
कडवई परिसरातील रुग्णांना ऑक्सिजन बेडची अत्यंत निकड होती. यासाठी गेले वर्षभर जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे हे प्रयत्नशील हाेते, असे वैद्यकीय अधिकारी संतोष यादव यांनी सांगितले. जफारुद्दीन काझी यांनी यासाठी लागणारे ऑक्सिजन बेड, नाना जुवळे यांनी इन्व्हर्टर, नवीद पांगारकर या युवकाने वॉटर हिटर व फ्रीज, राजवाडी ग्रामपंचायत व रांगव शेनवडे ग्रामपंचायतीतर्फे वातानुकूलित यंत्र देण्यात आले आहे. कडवई ग्रामपंचायतीने पुढाकार घेत, इतर सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत, तसेच तुरळ ग्रामपंचायतीनेही दहा बेड, चिखली ग्रामपंचायतीने दोन दूरदर्शन संच भेट दिले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, शिवसेनेचे गणेश ब्रीद यांनी आर्थिक मदत केली. राहील पांगारकर यांनीही यासाठी सहकार्य केले. रुग्ण कल्याण समिती सदस्य विलास पुरोहित यांनीही या कक्षाबाबत समाधान व्यक्त केले, तर ग्रामस्थ गोपाळ लिंबूकर यांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
यावेळी कडवई सरपंच विशाखा कुवळेकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे, चिखली सरपंच मैथिली कांनाल, राजीवली सरपंच शमिका पाटोळे, राजवाडी सरपंच अस्मिता देवरुखकर, उपसरपंच दिलीप गुरव, कुंभारखाणी सरपंच गीता सुर्वे, रांगव शेनवडे सरपंच दत्ता लाखण, डाॅ.निनाद धने, धनराज घुले, पोलीस पाटील रमेश तुळसनकर उपस्थित होते. निनाद धने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
-----------------------
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील विलगीकरण कक्षाची संताेष थेराडे यांनी पाहणी केली.