धारतळे येथे उभारणार ऑक्सिजन बेडचे काेविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:24+5:302021-05-11T04:33:24+5:30
राजापूर : कोरोनाबाधितांसाठी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ऑक्सिजन बेडचे कोविड रुग्णालय उभारावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले ...

धारतळे येथे उभारणार ऑक्सिजन बेडचे काेविड रुग्णालय
राजापूर :
कोरोनाबाधितांसाठी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ऑक्सिजन बेडचे कोविड रुग्णालय उभारावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले यांनी केली होती. त्यानंतर आ. राजन साळवी यांच्या प्रयत्नातून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंजुरी दिली आहे़ येत्या काही दिवसांमध्ये धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड रुग्णालय उभारले जाणार आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना झपाट्याने प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या भागातील कोरोनाबाधितांवर उपचारासाठी त्यांना रायपाटण येथील कोविड सेंटरसह रत्नागिरी येथे हलवावे लागते. मात्र, रायपाटण कोविड सेंटर आणि रत्नागिरी यांच्यामध्ये अंतर खूप जास्त असल्याने त्या ठिकाणी कोरोनाबाधितांना ने - आण करताना अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा तर या प्रवासामध्ये वेळीच उपचार न झाल्याने कोरोनाबाधितांची प्रकृती ढासळून तो दगावण्याची स्थिती निर्माण होते. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमधील कोरोनाबाधितांसाठी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड रुग्णालय व्हावे, अशी मागणी नागले यांनी निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल घेऊन साळवी यांनी साेमवारी (१० मे) जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची भेट घेतली़ त्यामध्ये त्यांनी मंजुरी दिली आहे. त्याचा लाभ धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रासह सोलगाव, जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना होणार आहे.