लोटेबाबत यंत्रणांच्या दुर्लक्षावर तीव्र संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:30 IST2021-03-21T04:30:18+5:302021-03-21T04:30:18+5:30
आवाशी : इतका मोठा प्रकार झाला तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीचे अधिकारी मात्र उशिरापर्यंत घटनास्थळी दाखल होत नाहीत, ...

लोटेबाबत यंत्रणांच्या दुर्लक्षावर तीव्र संताप
आवाशी : इतका मोठा प्रकार झाला तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीचे अधिकारी मात्र उशिरापर्यंत घटनास्थळी दाखल होत नाहीत, हे दुर्दैव असल्याची सणसणीत टीका आमदार भास्कर जाधव यांनी शनिवारी केली. काम करण्याची इच्छा नाही, अशा अधिकाऱ्यांना आपण त्यांना समजेल, अशा प्लॅटफॉर्मवरून उत्तर देऊ, असेही त्यांनी सांगितले.
लोटेतील घरडा केमिकल्स कंपनीला आग लागल्यानंतर आमदार जाधव यांनी लगेचच कंपनीला भेट दिली. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, शिवसेनेचे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी होते.
चिपळूणला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय आहे. एमआयडीसीचे कार्यालय आहे; पण एवढी मोठी घटना घडूनही तेथील अधिकारी घटनास्थळी हजर नाहीत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर रिजनल मॅनेजर यांचा मोबाईल बंद आहे. त्यांच्या सायन येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन अर्धा तास व्यस्त आहे. या यंत्रणांना घटनेचे गांभीर्य कळत नाही का, असा प्रश्न आमदार जाधव यांनी केला.
या सर्व यंत्रणांना आपण त्यांना समजेल अशा प्लॅटफॉर्मवरून उत्तर देऊ. आम्ही काही करायला गेलो की सरकारी कामात व्यत्यय आणल्याचा गुन्हा दाखल करायला हे अधिकारी तयारच असतात आणि पोलिसांनाही तेच हवे असते. त्यामुळे त्यांना समजेल, अशा ठिकाणावरूनच उत्तर देऊ, असे ते म्हणाले.