जिल्ह्यात दाखल झालेल्यांपैकी ३७ जण निघाले पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:37 IST2021-09-12T04:37:01+5:302021-09-12T04:37:01+5:30
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी जिल्ह्याबाहेरून तब्बल १ लाख ९१६ चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामध्ये ज्यांच्यात कोरोना सदृश लक्षणे दिसणाऱ्यांची ...

जिल्ह्यात दाखल झालेल्यांपैकी ३७ जण निघाले पाॅझिटिव्ह
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी जिल्ह्याबाहेरून तब्बल १ लाख ९१६ चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामध्ये ज्यांच्यात कोरोना सदृश लक्षणे दिसणाऱ्यांची चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ८८६० जणांची चाचणी करण्यात आली असून, त्यामध्ये ३७ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. तर शनिवारी एकाची दिवशी २,५६१ चाचणीपैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्वजण गुहागर तालुक्यातील असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ५ सप्टेंबरपासून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल हाेरू लागले आहेत. यामध्ये रेल्वेतून ३१,०९०,एस. टी. बसमधून २४,८५८, खासगी आराम बसने २२,६६९, खासगी वाहनाने २२,२९९ असे एकूण १ लाख ९१६ चाकरमानी दाखल झाले आहेत. गतवर्षी सरसकट सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यावर्षी जिल्हा प्रशासनाने त्यात बदल करून ज्यांना कोरोना सदृश लक्षणे दिसून येतात त्यांचीच आरटीपीसीआर किंवा अँटीजन चाचणी करण्याचा निर्णय घेतला.
त्यातील पहिला अहवाल शनिवारी जिल्हा आरोग्य विभागाने जाहीर केला आहे. ५ सप्टेंबरपासून ८८६० जणांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण ३७ जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. तर शनिवारी (११ सप्टेंबर) चाचणी केलेल्या २५६१ जणांच्या अहवाल प्राप्त झाला असून, त्यातील १२ जणांचा अँटिजन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण गुहागर तालुक्यातील आहेत. यातील ११ जणांना गृह विलगीकरणमध्ये तर एकाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अद्याप ९,४०५ जणांचे अहवाल प्रगतीपथावर आहेत, असे डॉ आठल्ये यांनी सांगितले.