अन्यथा शिवसैनिकही गप्प बसणार नाही!
By Admin | Updated: October 21, 2016 01:03 IST2016-10-21T01:03:27+5:302016-10-21T01:03:27+5:30
सूर्यकांत दळवी : गद्दारांना पाठीशी घालत असाल तर खबरदार!

अन्यथा शिवसैनिकही गप्प बसणार नाही!
दापोली : विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी स्थापन करून शिवसेनेच्या विरोधात उघडउघड काम करणारे प्रदीप सुर्वे, सुधीर कालेकर, भगवान घाडगे, संतोष गोवले यासारख्या गद्दारांना जर कोणी नेता पाठीशी घालत असेल आणि आपल्या स्वार्थासाठी ज्या गद्दारांची पदांवर वर्णी लावण्याचा प्रयत्न करणार असेल, तर आम्ही सच्चे शिवसैनिक हे कदापी सहन करणार नाही. त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा देत माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी गद्दारांविरूध्दच्या एल्गाराला सुरूवात केली.
दापोली, मंडणगड, खेड तालुक्यांचे तालुकाप्रमुख व उपजिल्हाप्रमुख बदलण्याच्या हालचालींना वेग आला असून, या पार्श्वभूमीवर दापोली, मंडणगड ग्रामीण तसेच मुंबई तालुका कार्यकारिणीची संयुक्त बैठक दापोलीतील पेन्शनर्स सभागृह येथे घेण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना दळवी हे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत दापोली, मंडणगडमधून १७ हजारांचे मताधिक्य गीते यांना मिळाले. विधानसभा निवडणुकीत या दोन्ही तालुक्यातून स्वबळावर लढताना ९ हजार ५००चे मताधिक्य मिळाले. विधानसभेच्या निसटत्या पराभवानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही ५० पैकी ४४ ग्रामपंचायतींवर भगवा फडकला. राष्ट्रवादीच्या ताब्यातील ६ पैकी ४ ग्रामपंचायती शिवसेनेने स्वबळावर ताब्यात घेतल्या. याउलट लोकसभेला खेडमध्ये ९ हजार ५०० मते कमी तर विधानसभेला ९५०० मतांचा फटका बसला असतानासुध्दा खेडच्या नेतृत्वात बदल न करता, जिथे चांगले काम चालले आहे, त्या दापोली, मंडणगडमध्ये तालुकाप्रमुख बदलण्याच्या हालचाली होत आहेत. इतकेच नव्हे तर त्यासाठी गद्दारांची नावे पुढे आणली जात आहेत. त्यामुळे हे कुटील कारस्थान हाणून पाडल्याशिवाय इथला शिवसैनिक गप्प बसणार नाही. यासाठी आपण लवकरच पक्षप्रमुख उध्दवजींची भेट घेणार असल्याचे सांगत, तेच आम्हाला न्याय देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
वर्तमानपत्रातील आपण भाजपच्या वाटेवर असल्याच्या गद्दारांनीच पेरलेल्या बातम्यांचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, आम्ही कालही शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आहोत आणि उद्याही शिवसैनिकच राहू. गद्दारांविरूध्द आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांविरूध्द जो काही लढा द्यायचा आहे, तो यापुढे अधिक निष्ठेने आणि तीव्रतेने देऊ. कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता एकजुटीने कामाला लागावे व आगामी नगरपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीत गद्दारांबरोबरच विरोधकांना धूळ चारून भगवा डौलाने फडकवूया, असे आवाहन केले.
यावेळी दापोली तालुकाप्रमुख शांताराम पवार, मंडणगड तालुकाप्रमुख राजू घोसाळकर, मंडणगड मुंबई संघटक शंकर गावणूक, दाभोळ विभागप्रमुख सुधीर वैद्य, पालगड विभागप्रमुख कासम महालदार, उन्हवरे विभागप्रमुख प्रभाकर गोलांबडे, अनंत वाजे, मुंबई विभागप्रमुख प्रवीण घाग, उपसभापती उन्मेष राजे, किशोर देसाई, उपजिल्हाप्रमुख राजू निगुडकर, आंजर्ले विभागप्रमुख राजेंद्र कदम, बुरोंडी विभागप्रमुख सुनिल कुळे आदींनीही गद्दारांचा समाचार घेतला. (प्रतिनिधी)