गणेशोत्सवासाठी यंत्रणांना सज्जतेचे आदेश
By Admin | Updated: September 8, 2015 22:22 IST2015-09-08T22:22:04+5:302015-09-08T22:22:04+5:30
रवींद्र वायकर : गणेशभक्तांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना

गणेशोत्सवासाठी यंत्रणांना सज्जतेचे आदेश
रत्नागिरी : जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सव काळात सर्व यंत्रणांनी परस्परांशी समन्वय साधून अपघातविरहीत वाहतुकीबरोबरच गणेशभक्तांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. पूर्वतयारीसंदर्भात आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते.मुंबई- गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी जागरूक राहावे. तसेच गणेशभक्तांचा ओघ सुरू होण्यापूर्वी महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम संबधित विभागांनी पूर्ण करावे. गणेशभक्तांना महामार्गावरील १९ मदत केंद्राच्या माध्यमातून वाहनधारकांना सुरक्षिततेच्या सूचना देण्यात याव्यात आणि आवश्यक मदतदेखील उपलब्ध करुन द्यावी. मदत केंद्राच्या ठिकाणी असणाऱ्या रुग्णवाहिकेत औषधे आणि डॉक्टर्सची उपलब्धता ठेवावीत. अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यात महामार्गावरील १९ ठिकाणी मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत. यात महसूल, पोलीस, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी नियुक्त असणार आहेत. याच्या माध्यमातून गणेशभक्तांना आवश्यक मदत देतांनाच सुरक्षिततेच्या सूचना देण्यात येतील. महामार्गावर आवश्यक ठिकाणी साईडपट्ट्या, संरक्षक कठडे आणि रिफ्लेक्टर लावण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. जिल्हाभरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.पोलीस अधीक्षक डॉ. शिंदे बंदोबस्तासाठी अतिरीक्त पोलीस, होमगार्डससह आणि एसआरपीएफची एक कंपनी मागविण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्हाभरात उत्सव काळात चोख बंदोबस्त राखण्यात येणार आहे, अशा माहिती दिली. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे गाड्यांमध्ये आणि रेल्वे स्थानकावरदेखील बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)