‘निवळी-जयगड’ला विरोध करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2015 00:28 IST2015-11-23T23:30:14+5:302015-11-24T00:28:08+5:30
हा निर्णय आम्हाला मान्य नसून, १५ मीटरचा रस्ता न केल्यास कामाला विरोध करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला

‘निवळी-जयगड’ला विरोध करणार
रत्नागिरी : तालुक्यातील निवळी - जयगड या ४२ किलोमीटरच्या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत एकूण १० मीटरचा रस्ता करण्याचा निर्णय झाला. हा निर्णय आम्हाला मान्य नसून, १५ मीटरचा रस्ता न केल्यास कामाला विरोध करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.वाटद, मिरवणे ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्यावर वाटद - खंडाळा या मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठ आहे. या ठिकाणी १५ ते २० गावातील लोक खरेदीसाठी येतात. आजूबाजूच्या गावातील लोकांसाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या परिसरात प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज असल्याने हजारो विद्यार्थी ये-जा करतात. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी दवाखाने, बँका, पतपेढ्या, पोस्ट आॅफीस, एस. टी. स्टॅण्ड, हॉटेल्स, रिक्षातळ व रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली बाजारपेठ असल्याने रुग्ण, वयोवृद्ध, महिला, पुरुष, मुले यांची सततची वर्दळ असते. तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता आजूबाजूच्या गावातून येणाऱ्या लोकांची येथे नियमीत गर्दी दिसून येते. खासगी वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने या महत्वाच्या गोष्टींकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. रस्त्याचे दुपदरीकरण करताना प्रत्यक्ष रस्ता १० मीटर व उर्वरीत ५ मीटरमध्ये गटार व पादचारी मार्ग करावा. बाजारपेठ परिसरात बंदिस्त गटार व उत्तम प्रतीचा फुटपाथ बांधणे, जमीन ताब्यात घेताना जमीनमालकांना त्यांच्या जागेचा योग्य मोबदला मिळावा, त्यांच्या पाल्यांना कंपनीत नोकरी मिळावी, दुपदरीकरण करताना येथील जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. खंडाळा तिठा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याने शासनातर्फे वाहतूक नियंत्रणाची कोणती उपाययोजना करण्यात येणार आहे, याबाबतची ग्रामस्थांना मिळावी. अन्यथा येथे सिग्नल व्यवस्था करावी. खंडाळा बाजारपेठ परिसर सपाट असल्याने गटाराच्या पाण्याची विल्हेवाट कशी करण्यात येणार आहे याची माहिती मिळावी. कंपनीने परिसराच्या विकासाकरिता सुसज्ज हॉस्पीटल, इंजिनिअरिंग कॉलेज या सुविधा पुरवाव्यात. तसेच बाजारपेठ परिसरात पार्किं गची सोय करावी, वाटद गावाला दत्तक घ्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी राकेश केदारी, दिलीप सुर्वे, शेखर भडसावळे, दीपक सुर्वे, राजेंद्र भडसावळे, अनिल धारकर, अशोक जोशी, विनोद जोग, राजेंद्र सागवेकर, राम साठे, प्रमोद चव्हाण, उल्हास मुळे, हेमंत सुर्वे, दीपक महाडिक, व्यापारी, जमीनमालकांनी उपस्थित होते. (प्रतिनिधी)