गोवळकोट स्लॅब मोरीला तिसऱ्यांदा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:30+5:302021-05-11T04:33:30+5:30
चिपळूण नगरपरिषद विशेष तातडीची सभा लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील गोवळकोट येथील नाल्याचा ...

गोवळकोट स्लॅब मोरीला तिसऱ्यांदा विरोध
चिपळूण नगरपरिषद विशेष तातडीची सभा
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील गोवळकोट येथील नाल्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या नाल्याचे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यासाठी स्लॅब मोरी टाकण्याचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या विशेष तातडीच्या सभेत ठेवला होता. मात्र, शिवसेेनेने त्याला विरोध केल्याने तिसर्यांदा ठेवलेला हा प्रस्ताव पुन्हा बारगळला आहे.
नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली होती. या सभेत कोरोनाच्या परिस्थितीमुळे नगरपरिषदेसाठी रुग्णवाहिका खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गोवळकोट रोड येथील नाल्याचा प्रस्ताव ठेवला. करंजेश्वरी देवी कमानीपासून लाईफकेअर हॉस्पिटलच्या विहिरीपर्यंत नाला वळविण्याबाबत काही नगरसेवकांनी सुचवले. मात्र त्याला शिवसेनेचे नगरसेवक मोहन मिरगल व अन्य नगरसेवकांनी विरोध केला. त्यामुळे तिसऱ्यांदा ठेवलेला हा प्रस्ताव पुन्हा एकदा बारगळला.
त्यानंतर शिवनदीतील गाळ उपशाबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. तसेच या कामासाठी आर्थिक व प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद अपरांत हॉस्पिटलच्या माध्यमातून कोविड सेंटर उभारत असून, त्याची पूर्वतयारी जोरदार सुरू केली आहे. त्यासाठी अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल चहुबाजूने सील करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे या सभेत कोविड सेंटरसाठी लागणारे साहित्य व फवारणीची यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.