उद्घाटनावर विरोधकांचा बहिष्कार
By Admin | Updated: August 20, 2015 21:58 IST2015-08-20T21:58:17+5:302015-08-20T21:58:17+5:30
राजापूर तालुका : मटण-मच्छी मार्केटचे नूतन इमारतीत स्थलांतर

उद्घाटनावर विरोधकांचा बहिष्कार
राजापूर : शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातुन व नगर परिषद फंडातून सुमारे ६२ लाख रूपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेल्या मच्छी व मटण मार्केट इमारतीचे उद्घाटन शनिवारी विधानपरिषद सदस्या अॅड. हुस्नबानू खलिफे यांच्याहस्ते झाले. या उद्घाटनाला नगर परिषदेतील शिवसेना - भाजपा विरोधी गटाने विरोध दर्शवत उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घातला.
गेले अनेक दिवस मच्छी आणि मटण मार्केटच्या नूतनीकरणाची मागणी करण्यात येत होती. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून या मच्छी व मटण मार्केट इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. यासाठी त्यावेळी अॅड. खलिफे यांनी पाठपुरावा केला होता. मात्र, केली पाच वर्षे या मच्छीमार्केट इमारतीचे बांधकाम रखडले होते. नगराध्यक्षा मुमताज काझी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी उपनगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे, मुख्याधिकारी रंजना गगे, माजी नगराध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर, यांच्यासह सत्ताधारी गटाचे सर्व नगरसेवक, मच्छीमार बांधवांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मच्छी व मटण मार्केट इमारतीमुळे राजापूर शहराच्या विकासात भर पडली आहे. हे मार्केट नियमित स्वच्छ ठेवणे या ठिकाणी मच्छी व मटण विक्रेत्यांना चांगल्या सुविधा नगर परिषदेने पुरवाव्यात. या मार्केटच्या अधिक आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधीही आपण उपलब्ध करून देऊ, मच्छी आणि मटण विक्रेत्या महिला आणि पुरूषांच्या आरोग्याची काळजीही पालिकेने घ्यावी, अशी मागणी यावेळी अॅड. खलिफे यांनी केली. (प्रतिनिधी)