तंटामुक्त समित्यांमध्ये संधी द्यावी
By Admin | Updated: October 23, 2014 00:05 IST2014-10-22T22:37:11+5:302014-10-23T00:05:04+5:30
महिलांचे अल्प प्रमाण : सक्षम कारभार करण्याची सततची तयारी

तंटामुक्त समित्यांमध्ये संधी द्यावी
मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -गावातील तंटे सोडवण्यासाठी जिल्ह्यात तंटामुक्त समित्यांची घोडदौड सुरू असताना समित्यांवर पुरूषांचीच मक्तेदारी अधिक आहे. जिल्ह्याचा विचार करता समित्यांवरील महिला अध्यक्षांचे प्रमाण अल्प आहे. या समित्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढल्यास तंटामुक्त समित्यांमध्ये सातत्य राखण्यास मदत होईल. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर महिला विराजमान असून, सक्षमपणे कार्यभार सांभाळत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था, विविध प्रशासकीय नोकऱ्या, व्यवसायामध्ये महिलावर्ग आपापली जबाबदारी सांभाळत आहेत. सर्व क्षेत्रांत पुरूषांच्या बरोबरीने काम करीत असतानासुध्दा तंटामुक्त समित्यांवर नियुक्ती करताना महिलांचा विचार केला जात नाही. महिलांचे प्रश्न महिलाच योग्यरित्या हाताळू शकतात. बहुधा घरातील शारीरिक, मानिसक छळास बळी पडलेल्या महिला आपल्या व्यथा तंटामुक्त समित्यांकडे मांडण्यास टाळाटाळ करतात. मात्र, या समितीचे नेतृत्व स्त्री कडे असेल तर आपले प्रश्न योग्यरित्या त्या मांडू शकतात.
सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या. गृहिणीपदाची भूमिका योग्यरित्या सांभाळूनदेखील आज विविध क्षेत्रात महिलांनी आपले वर्चस्व सिध्द केले आहे. कुटुंबाबरोबर समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा सहभाग निश्चित महत्त्वाचा राहिला आहे. त्यामुळे तंटामुक्त समित्यांवर सध्या त्यांचे वर्चस्व अल्प असले तरी समित्यावर असलेल्या महिलांनी आपली जबाबदारी योग्यरित्या सांभाळलेली दिसून येत आहे. वाडापेठ - आडिवरे (ता. राजापूर) तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष स्नेहल रुमडे यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक तंटे सोडविले आहेत. राजापूर तालुक्यातील तंटामुक्त समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे.
गावातील कौटुंबीक तंटे सोडवण्याबरोबर दिवाणी, महसुली, फौजदारी, कामगारांचे तंटे मिटवण्याचे काम स्नेहल रुमडे यांनी केले आहे. गावात शांतता राहावी, यासाठी तंटे होऊच नये, अशी भूमिका रुमडे यांनी ठेवली होती. गावात छोटे वाद झाल्यानंतर थेट घटनास्थळी पोहोचून रुमडे त्या वादावर तत्काळ तोडगा काढण्याची पध्दत आहे. परंतु वाद सोडविताना त्यांना वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागले. तंटे सोडविताना अनेक कटू अनुभवही आल्याचे त्यांनी सांगितले.
रुमडे यांनी वाडापेठ येथे नळपाणी योजनेबरोबर गटारे, रस्त्यांची सोय केली. गावात महिलांचे बचत गट स्थापन करुन महिलांच्या हाताला काम दिले. गेली अनेक वर्षे गावात स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नव्हती. रुमडे यांनी शासनाच्या माध्यमातून तीन स्मशानशेड उभारल्या आहेत. अंगणवाडीसेविका म्हणून कार्यरत असलेल्या रुमडे यांना जिल्ह्यात तंटामुक्त अभियान सुरू झाले, त्याचवर्षी त्यांना नेतृत्त्वाची संधी मिळाली. महिलांनी तंटामुक्त अभियानात सक्रिय होणे आवश्यक आहे.