रत्नागिरी : वैफल्यग्रस्त विरोधकांना सत्ता गेल्याचे प्रचंड दु:ख आहे. कावीळ झालेल्या माणसांना सगळे पिवळे दिसते, अशी विरोधकांची अवस्था आहे. करायचा म्हणून विरोधक दौरा करीत आहेत, त्यामुळे फक्त टीका करण्यापलीकडे विरोधक काहीच करीत नसल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी रत्नागिरी येथे केली. त्यामुळे विरोधकांच्या टीकेकडे आम्ही लक्ष देत नसल्याचे उत्तर माणिकराव जगताप यांनी दिले.
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत माणिकराव जगताप यांनी पाहणी दौरा केला. त्यांनी थेट मासेमारी बोटीत उतरून मच्छीमारांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर प्रसारमाध्यांशी बाेलताना माणिक जगताप यांनी विराेधकांवर टीका केली. ते पुढे म्हणाले की, ही आपत्ती आहे, राज्य सरकारचे विविध प्रतिनिधी इथं पाहणी करून अहवाल देण्याचे काम करीत आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते कोकणात येत आहेत. नुकसानग्रस्तांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, विराेधक केवळ करायचा म्हणूनच दाैरा करत असल्याचे सांगितले.
यावेळी नाना पटोले यांनी रत्नागिरीतील मिरकरवाडा जेट्टीला भेट देत बोटींच्या नुकसानाची मच्छीमारांकडून माहिती घेतली. वादळात मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. मिरकरवाडा येथील सुमारे २८ मच्छीमारी नौका बाधित झाल्या आहेत. या सर्व नुकसानाची पटोले यांनी माहिती घेतली. तसेच त्यावेळी मच्छीमारांच्या समस्या साेडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू, असे सांगितले.
रत्नागिरी जिल्हा मच्छीमार संघाचे बाबामियाँ मुकादम यांनी नाना पटोले यांना काही समस्या सांगितल्या. यावेळी माजी खा. हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष माणिक जगताप, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय भोसले, माजी आ. हुस्नबानू खलिफे, काँग्रेस नेते अविनाश लाड, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, प्रदेश चिटणीस रमेश कीर, अशोक जाधव, राजीवडा मच्छीमार सोसायटीचे सदस्य शब्बीर भाटकर, जय हिंद मच्छीमार सोसायटीचे आयरे, कोकण विभागीय फिशरमन काँग्रेसचे मार्तंड नाखवा, शहराध्यक्ष राकेश चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अश्फाक काद्री, बंडू सावंत, जिल्हा जनरल सचिव दीपक राऊत, निसार दर्वे, निसार बोरकर, करीम नाकवा, शकील दाव्त, अश्विनी आगाशे, सुस्मिता सुर्वे, रूपाली सावंत, कपिल नागवेकर उपस्थित होते.