राजन तेली यांचे कारनामे उघड करु---काँग्रेसविरोधात तेलींनी राजकारण केले: गावडे

By Admin | Updated: September 18, 2014 23:21 IST2014-09-18T22:03:20+5:302014-09-18T23:21:35+5:30

सतीश सावंत : पत्रकार परिषदेत आव्हान

Opening the exploits of Rajan Teli - Teli's politics against Congress: Gawade | राजन तेली यांचे कारनामे उघड करु---काँग्रेसविरोधात तेलींनी राजकारण केले: गावडे

राजन तेली यांचे कारनामे उघड करु---काँग्रेसविरोधात तेलींनी राजकारण केले: गावडे

कणकवली : स्वत:च्या राक्षसी महत्वाकांक्षेपोटी राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या राजन तेली यांनी माझे कारनामे उघड करावेत, असे आव्हान देतानाच सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यातील राजन तेलींचे कारनामे मला माहित असून त्याचे एक पुस्तकच तयार होईल. हे कारनामे मी उघड केले तर सावंतवाडीतील लोक तेली यांना उमेदवारी अर्जच दाखल करायला देणार नाहीत, अशी टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद कर्ले उपस्थित होते. सतीश सावंत म्हणाले, राजन तेली यांनी माझ्यावर आरोप केले असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी त्यांना उत्तर देत आहे. आपल्यावर करण्यात आलेल्या टीकेला सामुदायिकपणे प्रत्युत्तर द्यावे असे मी सांगितल्याचे तेली म्हणत आहेत. हे हास्यास्पद आहे. प्रत्युत्तर द्यायला जर मी सांगितले असते तर मी मुंबईवरून येईपर्यंत पत्रकार परिषद घ्यायचे का थांबविले नाही? तसेच ८ जुलैच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत या गोष्टी उघड का केल्या नाहीत? याचे उत्तर द्यावे. त्यामुळे आमदारकीबाबतचे तेलींचे वक्तव्यही हास्यास्पद आहे. याउलट कणकवली तसेच कुडाळ मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे माहित असल्यानेच सावंतवाडी मतदारसंघावर डोळा ठेवून तेली यांनी अगोदरपासून प्रयत्न सुरु केले होते. २००६ मध्ये आमदारकी मिळाल्यानंतर तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ वगळता इतर पाच तालुक्यात पक्ष वाढीसाठी कधीही फिरल्याचे मला निदर्शनास आलेले नाही. सावंतवाडी मतदारसंघात आघाडीची भूमिका पाळायची किंवा नाही याचा निर्णय नारायण राणेच घेणार आहेत. आम्ही फक्त कार्यकर्त्यांची भूमिका जाहीर केली आहे, असेही सावंत यांनी सांगितले. (वार्ताहर)


तेलींचे राष्ट्रवादीत जाणे पूर्वनियोजित
दीपक केसरकर, शिवराम दळवी, परशुराम उपरकर, शंकर कांबळी, पुष्पसेन सावंत, सुरेश दळवी यांच्याबाबत राणे यांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे कामच आतापर्यंत तेली यांनी केले आहे. तेली यांची कटकारस्थाने राणे कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर गणपती तसेच मुलांची शपथ घेऊन त्याचा इन्कार त्यांनी केला आहे. तेलींना आतापर्यंत जेवढी पदे मिळाली तेवढी पदे दुसऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याला मिळालेली नाहीत. मग त्यांना आणखी कोणता न्याय हवा होता? त्यांचे राष्ट्रवादीत जाणे पूर्वनियोजित होते.

काँग्रेसविरोधात तेलींनी राजकारण केले: गावडे
सावंतवाडी : माजी आमदार राजन तेली यांनी आतापर्यंत कोणते चांगले काम केले आहे ते त्यांनी दाखवून द्यावे. ते सावंतवाडी कारागृहात असताना मी त्यांची सहा महिने सेवा केली आहे. त्यामुळे आमच्यावर टीका करण्याचा अधिकार तेलींना नाही, असे काँॅग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी सांगितले. ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आंबोली सरपंच बाळा पालयेकर हे उपस्थित होते. तेलींना तिकीट दिल्यास निवडणूक रिंगणात उतरून बंडखोरी करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.
तालुकाध्यक्ष बाळा गावडे म्हणाले, बाहेरून येऊन आम्हाला कोणी तत्वज्ञान सांगू नये. येथील जनतेला कोण आपले आणि कोण बाहेरचे हे चांगले ओळखता येते. माजी आमदार राजन तेली यांनी कोणते विकासाचे काम केले आहे, ते त्यांनी सांगावे. फक्त काँॅग्रेसमध्ये राहून फोडाफोडीचेच राजकारण करणे, हा त्यांचा एकमेव धंदा राहिला आहे. तेलींनी नेहमी काँग्रेसविरोधात काम केले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
तर दुसरीकडे राजन तेली हे खुनाच्या गुन्ह्यात सावंतवाडी कारागृहात असताना मी त्यांची सहा महिने सेवा केली आहे. मग आता आमच्यावर टीका कशी काय करतात, असा सवालही त्यांनी केला. जर तेलींनी टीका न थांबविल्यास यापेक्षाही कडक भाषेत उत्तर देण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसने तेलींना तिकीट दिल्यास बंडखोरी करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Opening the exploits of Rajan Teli - Teli's politics against Congress: Gawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.