रत्नागिरीत खुलेआम वाळूचोरी
By Admin | Updated: August 11, 2015 00:08 IST2015-08-11T00:08:34+5:302015-08-11T00:08:34+5:30
यंत्रणेचे दुर्लक्ष : दररोज शेकडो ब्रास सागरी वाळूचे बेकायदा उत्खनन

रत्नागिरीत खुलेआम वाळूचोरी
रत्नागिरी : जिल्ह्यात बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. रत्नागिरीच्या भरारी पथकाकडून गेल्या दोन दिवसात चिपळूणच्या गोवळकोट खाडीतील वाळू चोरणाऱ्यांवर झालेल्या कारवाईचे स्वागत होत आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांच्या काळात शेकडो ब्रास सागरी वाळूची चोरी राजरोस होत असूनही ती महसूल विभाग, भरारी पथकाला दिसू नये, याबाबत नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत असून, चर्चेला उधाण आले आहे.
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराजवळच लागून असलेल्या पांढरा समुद्र येथील किनाऱ्यावरील वाळू खणून ती छोट्या वाहनांतून राजरोस नेली जाते, याकडे महसूल खात्याचे दुर्लक्ष असल्याचे व लाखो रुपयांची रॉयल्टी बुडत असल्याचे वृत्त लोकमतने काही काळापूूर्वी दिले होते. त्यानंतर तहसीलदारांनी पांढरा समुद्र येथे कारवाई केली. मात्र, त्यानंतर ही मोहीम थंडावली. पुन्हा पांढरा समुद्र खणण्याचे काम अव्याहतपणे सुरू झाले आहे.
पांढऱ्या समुद्रापासून जवळच असलेल्या पंधरामाड, मिऱ्या, जाकीमिऱ्या येथे सागरी आक्रमणामुळे धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी करोडो रुपये खर्च करावे लागले आहेत. मात्र, पांढरा समुद्र येथील किनारा सातत्याने खणला जात असून, त्यामुळे सागराचे पाणी आत घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या ठिकाणी धोका निर्माण झाल्याचे सांगत भविष्यात येथेही धूपप्रतिबंधक बंधाऱ्यावर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा सागरी वाळूचे राजरोस होणारे उत्खनन व चोरी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र, कारवाई नेमकी कोणत्या कारणाने होत नाही, असा सवालही नागरिकांतून केला जात आहे.
गोवळकोट येथे गेल्या दोन दिवसात रत्नागिरीच्या भरारी पथकाने वाळूमाफियांना दणका देणारी कारवाई केली आहे. अशीच कारवाई पांढरा समुद्र येथे कधी होणार असा सवाल केला जात आहे. या ठिकाणी दिवसा व रात्रीही छोट्या वाहनांमधून सागरी वाळू भरून ती विक्रीसाठी नेली जात आहे.
वाहने किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी दगडी रस्ताही तयार करण्यात आला आहे. ही स्थिती असताना हा रस्ता उखडण्याची कारवाई शासकीय खात्याने का केली नाही, हा चर्चेचा विषय ठरला आहे. (प्रतिनिधी)
ढिगारा पोखरला
गेल्या दोन वर्षांपूर्वी मिरकरवाडा बंदरातील गाळ ड्रेझरद्वारे उपसा करण्यात आला. या वाळूवजा गाळाचा ढिगारा पांढरा समुद्रकिनाऱ्यावरच करून ठेवण्यात आला आहे. त्या ढिगाऱ्यातील निम्मी वाळू मेरिटाईम बोर्डाला विकत देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित निम्म्या ढिगाऱ्यालाही वाळूमाफियांनी पोखरले आहे. या ढिगाऱ्याशेजारीच असलेल्या वाळूच्या दुसऱ्या ढिगाऱ्यातही वाळू चोरीमुळे बोगदे तयार झाले आहेत. मिरकरवाडाच्या दिशेने किनाऱ्यावरील वाळूही खणल्याचे दिसून येत आहे. हे उत्खनन व वाळूचोरी सुरूच राहिल्यास काही काळाने पांढऱ्या समुद्रकिनाऱ्यावरही करोडो रुपये खर्चून धूपबंधारा बांधावा लागणार असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.