दापोलीत केवळ ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’

By Admin | Updated: October 21, 2016 00:59 IST2016-10-21T00:59:46+5:302016-10-21T00:59:46+5:30

नगरपंचायत निवडणूक : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आतापासूनच चर्चा

Only 'Wait and watch' in Dapoli | दापोलीत केवळ ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’

दापोलीत केवळ ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’

दापोली : तालुक्यात आता जिल्हा परिषदेचे ७ ऐवजी ६ गट झाले आहेत. यापैकी केवळ दोन गटांमध्ये आरक्षणात बदल झाल्याने सध्यातरी सर्व पक्ष व कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. दापोली नगरपंचायतीची निवडणूक तोंडावर असल्याने सध्यातरी सर्वांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
राजेंद्र फणसे यांनीदेखील जिल्हा परिषदेकरिता दुसरा मतदार संघ न पाहता, पंचायत समितीकरिता प्रयत्न करू, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे त्यांना दुसरा मतदार संघ शोधावा लागणार नाही. यामुळे त्यांचे पुनर्वसन पक्षाला करावे लागणार नाही. पालगड जिल्हा परिषद गटात राजेंद्र फणसे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांनीदेखील मोठ्या मनाने पक्ष देईल, त्या उमेदवाराचे काम करण्याचे जाहीर केले आहे. यामुळे पालगड गटात सध्यातरी शिवसेना ‘सेफ’ असल्याची चर्चा आहे. मात्र, केळशी येथे पक्ष कुणाला उमेदवारी देतो, यावर तेथील गणिते अवलंबून आहेत. अडीअडचणीला धावून जात मदत करणारा अशी भगवान घाडगे यांची परिसरात ख्याती असल्याने शिवसेना नेतृत्व भगवान घाडगे याच्या ‘फेवर’मधील उमेदवार केळशीत देते की धोका पत्करून अन्य उमेदवार देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.
याआधी तालुक्यात केळशी, पालगड, हर्णै, टाळसुरे, उन्हवरे, दाभोळ, जालगाव असे ७ जिल्हा परिषद गट होते. यापैकी हर्णै व जालगाव गट वगळता सर्वच गटांवर सेनेचे वर्चस्व होते. गेल्या निवडणुकीत हर्णै गटावर राष्ट्रवादीच्या सुजाता तांबे या निवडून आल्या होत्या तर जालगाव गटावर प्राबल्य असणारे भाजपचे केदार साठे यांच्या नेतृत्वाखाली जान्हवी धाडवे या निवडून आल्या होत्या. त्यांनी तत्कालिक राष्ट्रवादीचे नेते किशोर देसाई यांच्या पत्नीचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. सध्या सेना-भाजपचे राज्य व स्थानिक अशा दोन्ही पातळ्यांवर एकमेकांशी जुळताना दिसून येत नाही. दोन्ही पक्षांकडून स्वबळाचे नारे देण्यात आले आहेत. त्यात किशोर देसाई हे पुन्हा ‘सेना’वासी झाले आहेत. यामुळे आता कोणता पक्ष कुणाला उमेदवारी देतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे. तसेच काँग्रेसचे विद्यमान तालुकाध्यक्ष अ‍ॅड. विकास मेहतादेखील याच मतदारसंघातील आहेत.
किशोर देसाई हे सेनेत गेल्याने आमदार संजय कदम यांना कार्यकर्त्यांची घरे शोधावी लागणार आहेत. यामुळे जर आघाडी झाली तरच येथील आघाडीच्या उमेदवाराला संधी मिळेल, अशी चर्चा ऐकू येत आहे. नवीन रचनेनुसार दाभोळपेक्षा बुरोंडीची लोकसंख्या वाढल्याने दाभोळ गटाचे नामकरण बुरोंडी जिल्हा परिषद गट असे झाले आहे. यामुळे माजी पंचायत समिती सभापती स्मीता जावकर यांना बुरोंडी येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
असोंडची लोकसंख्याही उन्हवरेहून अधिक झाल्याने उन्हवरे गटाचे नामकरण असोंड जिल्हा परिषद गट असे झाले आहे. यामुळे तालुक्यात आता केवळ ६ जिल्हा परिषद गट अस्तित्वात राहीले आहेत. पूर्वीच्या उन्हवरे आणि आत्ताच्या असोंड जिल्हा परिषद गटातील विनायक गायकवाड यांना आरक्षणाचा फटका बसला असून, येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण पडल्याने त्यांचा येथून पत्ता कट झाला आहे. अन्य गटात या आरक्षणाने फारसा फरक पडणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने सध्या सर्वच राजकीय पक्षांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची सावध भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Only 'Wait and watch' in Dapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.