युतीच्या बॅनरवर फक्त शिवसेना
By Admin | Updated: June 21, 2014 00:10 IST2014-06-21T00:10:20+5:302014-06-21T00:10:43+5:30
गीते सत्कार : अंतर्गत गटबाजी उघड

युतीच्या बॅनरवर फक्त शिवसेना
मंडणगड : लोकसभा निवडणुकीनंतर उत्तर रत्नागिरीतील पाचही तालुक्यात वेळोवेळी झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेने महायुतीतील घटक पक्षांना योग्य तो सन्मान देण्याचे टाळले असल्याने महायुतीत बिघाडी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. खासदार अनंत गीते यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात महायुतीचा बॅनर लागला नाही. त्यावरून हा मुद्दा पुढे आला आहे.
स्वागताचे सर्व कार्यक्रम एकट्या शिवसेनेने आयोजित केले. विधानसभा तोंडावर असताना घटक पक्षांची नाराजी ओढावून घेणे शिवसेनेला परवडणारे नाही. महायुतीतील घटक पक्षांना योग्य तो सन्मान द्यावा लागणार आहे. निवडणुकीत गीते यांनी निसटता का होईना, पण विजय मिळवला.
दापोली मतदार संघात रामदास कदम यांचा जाहीर विरोध, संजय कदम, भास्कर जाधव या पूर्वाश्रमीच्या सेनेच्या कार्यकर्त्यांचा विरोध व शेकापचे सोडून जाणे यामुळे चार लाखांचा आकडे अबाधित ठेवणे गीतेंना कठीण जात होते. मात्र अशा परिस्थितीतही कोणतीही नाराजी ओढवणे परवडणारे नव्हते. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम केले. वारकरी संप्रदायही गीतेंच्या बाजूने उतरला व सर्वाचा परिपाक गीते यांच्या विजयात झाला.
विरोधक आक्रमक आहेत, पक्षापक्षात गटबाजी वाढली आहे. या साऱ्याला तोंड देण्यासाठी महायुतीतील सर्व पक्षांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. तरीही अनंत गीते यांच्या सत्काराच्या बॅनरवर केवळ शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांची उल्लेख होते. भाजप किंवा रिपब्लिकन पदाधिकाऱ्यांना त्यासाठी विश्वासात घेण्यात आले नव्हते.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेला गड राखण्याचे आव्हान पेलण्यासाठी अंतर्गत नाराजी थोपवावीच लागणार आहे. कोकणात शिवसेना-भाजप हातात हात घालून सत्तेवर येऊ इच्छितात हेच यापुढे दाखविण्याचा हा खटाटोप असेल असले मत एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. (वार्ताहर)