पोषण अभियानातील कंत्राटी कर्मचारीच उपाशीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:33 IST2021-09-03T04:33:28+5:302021-09-03T04:33:28+5:30
रत्नागिरी : महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी मुख्यालय व एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील पोषण अभियानांतर्गत काम ...

पोषण अभियानातील कंत्राटी कर्मचारीच उपाशीच
रत्नागिरी : महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी मुख्यालय व एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील पोषण अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेले ६ महिने मानधनच मिळालेले नाही. त्यामुळे हे कंत्राटी कर्मचारी काम बंद करण्याच्या तयारीत आहेत..
पोषण अभियानांतर्गत शासन नियुक्त एस २ इन्फोटेक इंटरनॅशनल लि., नरिमन पॉईंट, मुंबई या कंपनीकडून रत्नागिरी जिल्ह्यात गट समन्वयक, जिल्हा प्रकल्प सहायक आणि जिल्हा समन्वयक यांची कंत्राटी नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे कर्मचारी मार्च २०१९पासून कार्यरत आहेत. सुरुवातीला काही महिने या कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर झाले. मात्र, अवघ्या सहा महिन्यांतच मानधनामध्ये अनियमितता सुरू झाली. पोषण अभियानांतर्गत या कर्मचाऱ्यांचे कंत्राट ३१ मार्च २०२१पर्यंत होते. या कर्मचाऱ्यांना ब्रेक दिल्यानंतर एप्रिल २०२१मध्ये पुन्हा ते कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाकडून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आधीच सहा-सहा महिने मानधन द्यायचे नाही आणि आवाज उठविल्यास त्याला कामावरून कमी करायचे, असे प्रकार सुरू आहेत. नुकतीच संबंधित कंपनीच्या वरिष्ठांसह या कर्मचाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. या कॉन्फरन्सच्या वेळी कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून धमकावण्यात आले. त्यामुळे हे कर्मचारी मानसिक तणावाखाली आहेत.
७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ पासून राष्ट्रीय पोषण महिना अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानामध्ये या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यास मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.