केवळ २९ गावे हागणदारीमुक्त
By Admin | Updated: October 30, 2015 23:16 IST2015-10-30T21:51:44+5:302015-10-30T23:16:04+5:30
संगमेश्वर तालुका : ९७ गावे अजूनही शिल्लक; यंत्रणा सज्ज

केवळ २९ गावे हागणदारीमुक्त
मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील २९ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. अजूनही ९७ गावे हागणदारीमुक्त करावयाची आहेत. यासाठी पंचायत समिती यंत्रणा पुर्णपणे झोकून काम करत आहे. ‘घर तेथे शौचालय’ अशी योजना शासनाने आणून याची अंमलबजावणी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठीची जनजागृतीही करण्यात येऊन योजनेचा प्रचार व प्रसार शासकीय कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. यात शौचालयाचे फायदे व तोटे तसेच आरोग्याची होणारी हानी याबाबत गावागावातून जागृती केली जात आहे. या प्रचाराचा संगमेश्वर तालुक्याला फायदा होत असून, १२६ गावांपैकी २९ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. यात बुरंबाड, डावखोल, धामापूर तर्फ देवरूख, गुरववाडी, कळंबुशी, कोळंबे, कोंडअसुर्डे, कोंडिवरे, कोंडकदमराव, कोंड्ये, कुरधुंडा, मांजरे, माभळे, मेढे तर्फ फुणगूस, मुरादपूर, निवळी, राजवाडी, सांगवे, शेंबवणे, तळेकांटे, तिवरे घेरा प्रचितगड, तुरळ, तुळसणी, करंबेळे तर्फ संगमेश्वर, गोळवली, भडकंबा, चाफवली, शिरंबे, कर्ली व मासरंग या गावांचा समावेश आहे.या योजनेच्या यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी पुरूषोत्तम सुर्वे, नरेंद्र पऱ्हाते, जे. आर. पारशे, गटसमन्वयक मिथुन थरवळ, समूह समन्वयक सावी दळवी, मनिषा सोलकर यांनी मेहनत घेतली. उर्वरित गावांमध्येही या योजनेचे काम सुरु असून, लवकरच तालुका हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. संपूर्ण तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असून, त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. (वार्ताहर)