दापोलीत केवळ २५ टक्केच पाऊस

By Admin | Updated: July 16, 2015 23:00 IST2015-07-16T23:00:55+5:302015-07-16T23:00:55+5:30

पर्यटकांमध्ये दापोलीची ओळख मिनी महाबळेश्वर म्हणून निर्माण झाली आहे.

Only 25 percent rain in Dapoli | दापोलीत केवळ २५ टक्केच पाऊस

दापोलीत केवळ २५ टक्केच पाऊस

शेतकरी चिंताग्रस्त : पावसाचा अनुशेष बाकीचदापोली : पावसाळा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत गेल्या १० वर्षांचा विचार केल्यास चार महिन्यांमध्ये दापोली तालुक्यात साधारणपणे ३८०० ते ४ हजार मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद होते. मात्र, पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी अद्याप दापोलीत आतापर्यंत केवळ १०६७ मिलिमीटर पाऊस बरसल्याने उर्वरित साधारण पातळीपर्यंत पाऊस कधी पडणार? याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत.पर्यटकांमध्ये दापोलीची ओळख मिनी महाबळेश्वर म्हणून निर्माण झाली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून पाऊस अनियमितपणे बरसत असल्याने तालुक्यात पावसाचा अनुशेष तसाच बाकी आहे. दापोलीत यापूर्वी प्रचंड प्रमाणात आणि नियमित स्वरूपात पाऊस पडत असल्याने नद्या, नाले दुथडी भरून वाहात असल्याचे चित्र होते. मात्र, यंदा केवळ दोन दिवस सलग पडलेल्या पावसाने ओढे, नद्यांना पूर आल्याचे चित्र नव्हते.
केवळ नद्या, नाल्यांमधील घाण साफ करण्याचे काम या पावसाने केले. मात्र, त्यानंतर आजतागायत पावसाने दडी मारल्यामुळे भातलावणी पूर्ण केलेला शेतकरीवर्ग पावसाकडे डोळे लावून बसला आहे. मात्र, हव्या त्या प्रमाणात पाऊस पडत नसल्याने अनेक ठिकाणी वरकस पट्ट्यात भातशेतीतील पाणी पूर्ण सुकून गेली असून, पिके पिवळी पडत चालली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण असून, पावसाने आणखीन दगा दिल्यास लावलेले भात शेतातच मरून पडण्याची शक्यता आहे. गेले आठ ते दहा दिवस तुरळक सरी वगळता पाऊस गायब असून त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणीही साचून राहत नाही. त्यामुळे शेती सुकून जात आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी भातशेतीच्या जवळ ओढे, नाले आहेत आणि जेथून पाणी घेता येणे शक्य आहे, अशा ठिकाणी शेतकरी हे पाणी भातशेतीकडे वळवताना दिसत आहेत. मात्र, असे असले तरी बहुतांश ठिकाणी ओढ्यांतील पाणी पूर्णपणे आटल्याने भातशेतीला पाण्याचा पुरवठा कुठून करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा राहिला आहे. (प्रतिनिधी)

दापोली तालुक्यात अन्य तालुक्यांच्या मानाने पावसाचे प्रमाण अजूनही जास्त आहे. मात्र, प्रतिवर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे शेती संकटात सापडत आहे. यंदाही पाऊस गायब झाल्याने भातशेती संकटात सापडली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगोदरच लावणीची कामे उरकली, त्यांच्या शेतात पावसाअभावी पाणी नसल्याने शेतजमीन पूर्णत: सुकून गेली असून, आणखी दोन दिवस पाऊस न झाल्यास शेती पिवळी पडण्याची भीती आहे.

Web Title: Only 25 percent rain in Dapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.