गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात आलेल्या ११ टक्के व्यक्तींचीच चाचणी ; ०.२ टक्के पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST2021-09-23T04:34:51+5:302021-09-23T04:34:51+5:30
रत्नागिरी : गणेशोत्सवात रत्नागिरीत आलेल्या १ लाख २३ हजार ५१२ नागरिकांपैकी १३ हजार ६१२ नागरिकांना कोरोना चाचणी करूनच जिल्ह्यात ...

गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात आलेल्या ११ टक्के व्यक्तींचीच चाचणी ; ०.२ टक्के पाॅझिटिव्ह
रत्नागिरी : गणेशोत्सवात रत्नागिरीत आलेल्या १ लाख २३ हजार ५१२ नागरिकांपैकी १३ हजार ६१२ नागरिकांना कोरोना चाचणी करूनच जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला तर ४२ हजार ३७४ जण कोरोना चाचणी करूनच जिल्ह्यात दाखल झाले होते. उर्वरितांकडे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र होते. त्यामुळे जिल्ह्यात केवळ ११ टक्के व्यक्तींचीच कोरोना चाचणी करावी लागली. यापैकी केवळ ३५ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला तर ३४ टक्के चाचणी करूनच जिल्ह्यात दाखल झाले.
गेल्यावर्षी प्रमाणे यंदा गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अधिक सतर्कता बाळगण्यात आली होती. जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले असल्याचे प्रमाणपत्र सोबत आणल्यास अथवा ७२ तासांपूर्वीचा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आणावा अथवा गावात दाखल झाल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल, असे आदेश काढले होते. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी ५ ते १९ सप्टेंबर या कालावधीत सुरू होती. जिल्ह्यात येण्यासाठी चार तपास नाके निश्चित करण्यात आले होते. याठिकाणी एसटी बसेस, खासगी गाड्या आणि रेल्वे गाड्यांमधून जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांची पूर्ण माहिती घेण्यात येत होती.
ही माहिती प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांमार्फत ग्राम तसेच शहरी कृती दलांकडे पाठविण्यात येत होती. यात ज्यांची कोरोना चाचणी झालेली नाही, किंवा दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नव्हते, अशांची आरटीपीसीआर किंवा ॲंटिजन चाचणी करून घेण्याची जबाबदारी या कृती दलांकडे सोपविण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून अशा व्यक्तींची चाचणी करण्यात येत होती.
जिल्हा प्रशासनाच्या या मोहिमेला चाकरमान्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात विविध मार्गाने दाखल झालेल्या १ लाख २३ हजार ५१२ नागरिकांपैकी १३ हजार ६१२ नागरिकांची कोरोना चाचणी करावी लागली. यापैकी केवळ ३५ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. यापैकी आरटीपीसीआर चाचणीत ४ आणि ॲंटिजन चाचणीत ३१ जण पाॅझिटिव्ह आले. तर ४२ हजार ३७४ जण येतानाच कोरोना चाचणी करून आले होते. तर उर्वरित ५५ टक्के लोकांकडे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र होते.
........
- ५ ते १९ या कालावधीत जिल्ह्यात आलेल्यांची संख्या : १,२३,५१२
- कोरोना चाचणी करून आलेले : ४२,३७४
आरटीपीसीआर : १२,९६४, ॲंटिजन : २९,४१०
- गावी आल्यावर चाचणी केलेले : १३,६१२
आरटीपीसीआर : १३०३, ॲंटिजन : १२३०९
- पाॅझिटिव्ह आलेल्यांची संख्या : ३५
आरटीपीसीआर : ४, ॲंटिजन : ३१
- कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले : ६७,५२६