आॅनलाईन खरेदी खत रेंगाळले
By Admin | Updated: April 13, 2015 00:09 IST2015-04-12T22:10:21+5:302015-04-13T00:09:39+5:30
गुहागर तालुका : तलाठ्यांची होतेय अडचण, खरेदी खत व्यवहारावर परिणाम

आॅनलाईन खरेदी खत रेंगाळले
गुहागर : गुहागर तालुक्यातील सातबारा संगणकीकरण तसेच खरेदी खत वारस तपास आदी सर्व प्रकारच्या नोंदी आॅनलाईन पद्धतीने करण्याचे काम प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. मात्र, महिनाभरात अद्याप एकही खरेदी खत नोंदविले गेले नसल्याने आॅनलाईन कामकाज पद्धत येथील तलाठ्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहे.सर्वत्र सातबारा संगणीकरण करणे शासनाचा उद्देश आहे. यासाठी रत्नागिरी लांजासह मंडणगड व गुहागर या लहान तालुक्यांची निवड प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे. यासाठी तलाठ्यांना पहिल्या टप्प्यात लॅपटॉप देण्यात आले होते. यासाठी सर्व सातबारे संगणकावर नोंदणी करण्यात आले होते. आता पुढील टप्प्यात नव्याने होणारी खरेदी खते, वारस तपास, फेरफार व इतर सर्व प्रकारच्या नोंदी या आॅनलाईन पद्धतीने करण्यासाठी शासनाने एक विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर बनवून घेतले आहे. हे सॉफ्टवेअर सर्व तलाठ्यांच्या लॅपटॉलपला लोड करण्यात आले असून ते खोलण्यासाठी विशिष्ट कोड देण्यात आले आहे. आॅनलाईन पद्धतीने नोंदी होताना खरेदी खतासह विशिष्ट प्रकारच्या निवडक नोंदीचाच यामध्ये समावेश आहे.
आजच्या स्थितीत अनेक तलाठ्यांना लॅपटॉप हाताळता येत नाही, हे वस्तुस्थिती आहे. अशा तलाठ्यांकडून दुसऱ्या तलाठ्यांना आपले काम करून देण्याची विनवणी करावी लागत आहे. तर नव्याने रुजू झालेले काही तलाठ्यांना संगणक हाताळण्याचे चांगले ज्ञान आहे.
पण प्रत्यक्षात या नोंदी घालताना सॉफ्टवेअरमध्येच काही त्रुटी राहिल्याने या नोंदी घेतल्या जात नाहीत, तर काही नोंदी योग्य प्रकारे झाल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांकडून मंजूर झाल्यानंतरही प्रत्यक्ष सातबारावर दिसत नाहीत. अशा अनेक वेगवेगळ्या विचित्र अनुभवांमुळे तलाठी हतबल झाले आहेत. एका नोंदीसाठी कधी एक तास तर कधी पाच तास एवढा वेळ देऊनही अखेर हाती काहीच लागत नसल्याने अखेर गुहागर तालुका तलाठी संघटनेने प्रांताधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
गुहागर तालुक्यात गेल्या महिनाभरात झालेल्या खरेदीखतांमध्ये अद्याप एकही खरेदी खत नोंदवले गेलेले नाही. यामुळे खरेदी खत करणारे तलाठ्यांकडे वारंवार विचारणा करताना दिसत असून शासनाच्या चुकीच्या कामकाज पद्धतीबाबत संताप व्यक्त करत असून याबाबत योग्य सुधारणा केल्यानंतर याची अंमलबजावणी करावी तोपर्यंत जुन्या पद्धतीनेच लेखी नोंदी मंजूर कराव्यात अशी मागणी असून याबाबत पुढे काय होणार याकडे लक्ष आहे. (प्रतिनिधी)
याबाबतची गंभीर दखल प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी घेतली असून तलाठ्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अशा नोंदी नक्की का होत नाहीत याची प्रत्यक्ष पहाणी करणार असल्याचे समजते. तसेच या संगणीकृत एकमेव असून ते स्वत: येथे येऊन तलाठ्यांना न होणाऱ्या नोंदीबाबत समस्या जाणून घेणार असल्याने लवकरच याबाबत शासनस्तरावर योग्य निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा केली जातआहे. हा निर्णय लवकरच अपेक्षीत असल्याचे बोलले जातेय.