ऑनलाईन जन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST2021-08-21T04:36:13+5:302021-08-21T04:36:13+5:30
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा स्वकुळ साळी समाज हितवर्धक मंडळातर्फे आराध्य दैवत भगवान श्री जीवेश्वर ...

ऑनलाईन जन्मोत्सव
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा स्वकुळ साळी समाज हितवर्धक मंडळातर्फे आराध्य दैवत भगवान श्री जीवेश्वर यांचा जन्मोत्सव शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. हा जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. यात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नारळ लागवड
रत्नागिरी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून तालुक्यातील हातीस गावात ७५ नारळ रोपांची लागवड करण्याचा उपक्रम ग्रामस्थांनी राबविला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जयवंत नागवेकर, प्रमोद नागवेकर, दीपक आंबुलकर, विजय नागवेकर, सुदर्शन नागवेकर यांनी परिश्रम घेतले.
गुणवंतांचा सत्कार
आवाशी : खेड तालुक्यातील कर्टेल या दुर्गम गावातील सेवानिवृत्त शिक्षणप्रेमी दिलीप चव्हाण यांच्या सहकार्याने गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. गावातील हनुमान मंदिरात हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, तालुकाप्रमुख विजय जाधव आदी उपस्थित होते.
रिक्षाचालकांना मदत
चिपळूण : बालगोपाळ मित्रमंडळ, बांद्रा (मुंबई) यांच्याकडून छत्रपती संभाजी चौक, रिक्षा स्टॅण्ड मार्कंडी येथील रिक्षाचालकांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्रदीप शिंदे, लक्ष्मण शिंदे, उपशहरप्रमुख संतोष पवार, विभागप्रमुख उमेश पवार, बाबू शिंदे आदी उपस्थित होते.
बाकाळे शाळेचे यश
राजापूर : तालुक्यातील जिल्हा परिषद बाकाळे शाळेचा एनसीसी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. पहिली ते चौथीपर्यंतचे सहा विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थ यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
भित्तीपत्रक विभाग उद्घाटन
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयात भित्तीपत्रक विभागाचे उद्घाटन कार्यवाह सुनील वणजू यांच्या हस्ते करण्यात आले. या भित्तीपत्रकात विद्यार्थ्यांचे विविधांगी लेखन प्रसिद्ध केले जाते. या भित्तीपत्रकाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य मधुरा पाटील, उपप्राचार्य वसुंधरा जाधव आदी उपस्थित होते.
दिव्यांगांचे प्रशिक्षण केंद्र
दापोली : दिव्यांग मुलांच्या जीवनात आनंदाची पहाट दिसावी, या सामाजिक भावनेतून शहराजवळील जालगाव येथे बहुविकलांग केंद्र सुरु करण्यात आले आहे. दिव्यांग मुलांसाठी असलेल्या या प्रशिक्षण केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले. हसमुख जैन, शुभांगी गांधी, संदीप राजपुरे, माहेश्वरी विचारे आदींच्या सहकार्याने हे केंद्र सुरु करण्यात आले आहे.
बस सुरु झाल्याने समाधान
दापोली : कोंढ्ये - दापोली ही एस. टी. बस सुरु झाल्याने दापोली येथे विविध कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे. कोंढे सरोदेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते कोंडू घोडेराव यांनी एस. टी.चे चालक आणि वाहक यांच्या निवाऱ्याची सोय केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली ही बस सुरु झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
अनधिकृत बांधकाम
देवरुख : शहरानजीकच्या साडवली सह्याद्रीनगर येथे अनेक वर्षांपूर्वी प्रवासी निवाराशेड बांधण्यात आली. गतवर्षी अज्ञात व्यक्तीने ही शेड पाडण्याचा प्रयत्न केला होता. सध्या या शेडमधूनच रस्ता तयार करण्यात आला आहे. साडवली परिसरात अनधिकृत बांधकामांना सध्या पेव फुटले असून, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी समविचारी मंचाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
वीजखांब बदलण्यास प्रारंभ
साखरपा : गेल्या अनेक वर्षांपासून देवडे अधिष्ठी गावात विद्युत खांब गंजल्याने पडू लागले होते. महावितरण विभागाकडे खांब उपलब्ध नसल्याने गंजलेले खांब बदलण्यास विलंब झाला होता. गावातील मोडकळीस आलेले हे खांब पडून दुर्घटना होण्याचा धोका निर्माण झाला होता. अखेर ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जुने खांब बदलण्याचे काम सुरु झाले आहे.