दुचाकीवर कंटेनर कोसळून एक ठार
By Admin | Updated: July 3, 2014 00:36 IST2014-07-03T00:29:26+5:302014-07-03T00:36:40+5:30
एकजण गंभीर जखमी : परशुराम घाटात अपघात

दुचाकीवर कंटेनर कोसळून एक ठार
आवाशी/ चिपळूण : चाटवहून खेडमार्गे तुरंबवला जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर कंटेनर कोसळून दुचाकीचालक सुरेश बाबा गोरे (वय ४८, रा. तुरंबव, चिपळूण) ठार झाले, तर त्यांचा मागे बसलेला सहकारी सुरेश ठेंगू गोरे (५३, रा. कोंडमळा नारळीची वाडी, ता. चिपळूण) गंभीर जखमी झाला. मुंबई-गोवा महामार्गावर लोटेनजीक परशुराम घाटात आज, बुधवारी सकाळी हा अपघात झाला.
ते काल, मंगळवारी आपल्या मामाकडे चाटव येथे गेले होते. आज सकाळी दुचाकी (एम्एच-०८ एसी ८४३५) वरून ते तुरंबवकडे येण्यासाठी निघाले होते. याच दरम्यान, महामार्गावर न्हावाशेवा येथून एक कंटेनर (एमएच-४६ एफ ३११४) गोव्याकडे जात होता. परशुराम बसस्थानकाअगोदर असलेल्या अवघड वळणावर दुचाकी पुढे होती आणि कंटेनर मागून येत होता. यावेळी कंटेनरची दुचाकीला धडक बसली. त्यामुळे दुचाकी पडली आणि फरफटत गेली. दुचाकी पडल्यामुळे कंटेनरचालकाने ब्रेक लावला; मात्र वळणावर ब्रेक लावल्यामुळे कंटेनर उलटला. तोपर्यंत कंटेनर पुढे आला होता. त्यामुळे उलटलेला कंटेनर दुचाकीवरच कोसळला. उलटलेल्या कंटेनरसोबत दुचाकी जवळजवळ २० फूट लांबपर्यंत घासत गेली. त्यात दुचाकी चालक सुरेश बाबा गोरे जागीच ठार झाले. त्यांचे हातपाय तुटले होते. मागे बसलेल्या सुरेश ठेंगू गोरे यांचा उजवा पाय नळीजवळ तुटला आणि अक्षरश: तुकडा पडला. अपघातामुळे तासभर महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. प्रवासी व पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले; मात्र जखमीचे तुटलेले अवयव पाहून सारेच सुन्न झाले. दोघांनाही तत्काळ डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले. जखमी सुरेशवर सायंकाळी शस्त्रक्रिया करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी. आर. चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत. (प्रतिनिधी)