मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी साेळा लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST2021-04-20T04:32:46+5:302021-04-20T04:32:46+5:30
आवाशी : लोटे - परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील समर्थ इंजिनीअरिंग या कंपनीत रविवारी झालेल्या स्फोटात लागलेल्या आगीमध्ये मृत ...

मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी साेळा लाखांची मदत
आवाशी : लोटे - परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील समर्थ इंजिनीअरिंग या कंपनीत रविवारी झालेल्या स्फोटात लागलेल्या आगीमध्ये मृत झालेल्या तीन कामगारांच्या नातेवाइकांना प्रत्येकी सोळा लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च कंपनी करणार असल्याची माहिती कंपनीचे मालक अमित जोशी यांनी दिली. येथील औद्योगिक वसाहतीतील समर्थ इंजिनीअरिंग या कंपनीत रविवारी सकाळी सव्वानऊ वाजता स्फोट होऊन आग लागली. आग लागली तेव्हा कंपनीत ९ कर्मचारी काम करीत होते.
होरपळून तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य सहा जण भाजून जखमी झाले. यात मदत करण्यासाठी गेलेल्या एका स्थानिक रहिवाशाचाही समावेश आहे. सहा जखमींपैकी चार जण मिरज, सांगली येथील सुश्रुत बर्न हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत. अन्य दोघांपैकी एक जण चिपळूण येथील लाइफ केअर हॉस्पिटल येथे तर एक घाणेखुंट येथील परशुराम रुग्णालयात उपचार घेत आहे.
सांगली येथे उपचारार्थ दाखल केलेल्या चौघांची प्रकृृती जैसे थे असून प्रकृतीत सुधारणा होणार असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाइकांना दिली आहे. मृत पावलेल्या बेळगाव येथील सचिन तलवार, कासई (ता. खेड) येथील मंगेश जानकर व भेलसई येथील विलास कदम यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी सोळा लाख रुपये मदत देणार असल्याचे कंपनी मालक अमित जोशी यांनी जाहीर केले आहे. मृतांच्या दहा दिवसांच्या विधी दिवशी यातील पहिला टप्पा म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येणार असून, उर्वरित रक्कम पुढील दोन टप्प्यांत देण्यात येणार आहे, असे कंपनी मालकांनी सांगितले.