दीड कोटींची कामे रखडली
By Admin | Updated: July 14, 2015 21:43 IST2015-07-14T21:43:28+5:302015-07-14T21:43:28+5:30
नगरोत्थान योजना : चिपळुणातील निधी परत जाण्याची भीती

दीड कोटींची कामे रखडली
चिपळूण : नगरोत्थान योजनेअंतर्गत सुमारे १ कोटी ८२ लाख २० हजार ९५० रुपयांची शहरातील विविध विकासकामे मंजूर झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांना कामाचा आदेश देण्यात आला. मात्र, कामे सुरु न झाल्याने हा निधी परत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रशासन यासंदर्भात कोणती भूमिका घेणार, याकडेही शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
पावसाळ्यापूर्वी विकासकामे व्हावीत, यादृष्टीने नगर परिषद प्रशासनाने नगरोत्थान योजनेअंतर्गत १ कोटी ८२ लाख २० हजार ९५० रुपयांची कामे मंजूर केली. ही सर्व कामे कमी दराची असून, १ कोटी ४४ लाख ९५ हजार ८८९ रुपयांची आहेत. गोवळकोट चौगुले घर ते मुख्य रस्ता डांबरीकरण १७ लाख ९ हजार २०० रुपयांचे हे काम असून, साई कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले आहे. या कामाचा आदेश ३० एप्रिल रोजी संबंधित ठेकेदाराला देण्यात आला आहे. रावतळे मुत्तपन्न मंदिर येथे साकव बांधण्याचे १३ लाख २० हजार २०० रुपयांचे काम असून, या कामाचा आदेश २९ एप्रिल रोजी रेणुका कन्स्ट्रक्शनला देण्यात आला आहे. वाणीआळी मुरलीधर मंदिर ते महाराष्ट्र हायस्कूलपर्यंतच्या डांबरीकरणाचे काम ९ लाख २८ हजार ८०० रुपयांचे असून, हे काम महेंद्र पालांडे यांना देण्यात आले असून, १४ मे रोजी कामाचा आदेश देण्यात आला आहे. वाणीआळी नवा कालभैरव मंदिर ते मुरलीधर मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे काम ९ लाख २८ हजार ८०० रुपयांचे असून, हे काम पंकज मोरे यांना देण्यात आले आहे. त्यांनी अद्याप करारनामा केलेला नाही. रॉयलनगर येथे आरसीसी गटार बांधण्याचे काम अंदाजे २२ लाख ५ हजार ९०० रुपयांचे असून, हे काम रेणुका कन्स्ट्रक्शनला देण्यात आला आहे. या कामाचा आदेश २९ एप्रिल रोजी संबंधित ठेकेदाराला देण्यात आला आहे. मतेवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मुख्य रस्ता ते आशीर्वाद अपार्टमेंटपर्यंतचे काम सुमारे १३ लाख २३ हजार २०० रुपयांचे असून, महेंद्र पालांडे यांना १४ मे रोजी कामाचा आदेश देण्यात आला. काविळतळी मुख्य रस्ता ते शालोम गल्ली पेविंग ब्लॉक व पाखाडीचे काम १६ लाख ८५ हजार ७०० रुपयांचे आहे. हे काम रेणुका कन्स्ट्रक्शनला देण्यात आले असून, या कामाचा आदेश देऊनही हे काम अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. गोवळकोट रोड ते गणेशघाट रस्ता डांबरीकरणाचे काम २१ लाख १८ हजार १०० रुपयांचे आहे. या कामाचा आदेश २९ एप्रिल रोजी रेणुका कन्स्ट्रक्शनला देण्यात आला. बचपन स्कूल ते विचारे घर डांबरीकरणाचे काम १६ लाख ११ लाख ६००चे असून, ठेकेदार प्रथमेश कापडी यांना कामाचा आदेश ८ मे रोजी देण्यात आला आहे. (वार्ताहर)
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा कमी दराची ही कामे आहेत. ९० दिवसांमध्ये काम करण्याची मुदत संबंधित ठेकेदारांना देण्यात आली आहे. मात्र, मुदतीत कोणत्याच ठेकेदाराने हे काम सुरु न केल्याने नगरोत्थान योजनेअंतर्गत अंदाजे दीड कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. प्रशासन या ठेकेदारांबाबत कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.