घरकुल योजनेबाबत अधिकारी धारेवर

By Admin | Updated: October 10, 2015 23:38 IST2015-10-10T23:38:45+5:302015-10-10T23:38:58+5:30

गुहागर पंचायत समिती सभा : मागासवर्गीयांची फसवणूक झाल्याचा आरोप

Officer regarding the Gharkul scheme | घरकुल योजनेबाबत अधिकारी धारेवर

घरकुल योजनेबाबत अधिकारी धारेवर

गुहागर : गुहागर पंचायत समितीच्या मासिक सभेत जिल्हा परिषद अंतर्गत रमाई घरकुल योजनेच्या कामामध्ये हेतूपुर्वक पैसे देत नसल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. ही मागासवर्गीयांची फसवणूक असून, वेळेत पेमेंट न केल्यास अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा उपसभापती सुरेश सावंत यांनी दिला.
जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत रमाई घरकुल योजनेची १०४ कामे झाली असताना फक्त २० कामांचेच मुल्यांकन झाले आहे. उर्वरित ८४ कामांचे हेतूपुरस्सर पेमेंट अडवून ठेवल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ गुन्हा दाखल करावा लागेल असा इशारा दिला.
सभापती राजेश बेंडल यांनीही ही बाब गंभीर असून, असा हलगर्जीपणा करु नका, असे सांगत दुजोरा दिला. इंदिरा आवास अंतर्गत ६५ पैकी २३ कामे अपूर्ण असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
१३व्या वित्त आयोगांतर्गत महिना अखेरपर्यंत निधी खर्ची टाकण्याची मुदत राहिली असताना १९ लाख रुपये निधी अद्याप खर्ची पडायचा राहिला असल्याचे निदर्शनास आणून दिले. खालचा पाट अंगणवाडी निर्लेखन झाली नसताना ६ आॅक्टोबरला भूमिपूजन कसे झाले? असा प्रश्नही या सभेत करण्यात आला. याविषयी कनिष्ठ अभियंता ढगे व उपअभियंता डी. आर. साळवी यांना धारेवर धरण्यात आले.
एस. टी.चे आगार व्यवस्थापक मासिक सभेला एकदाही येणार नसतील तर आमसभेतही प्रवेश देणार नाही, असे सुनावण्यात आले. गणेशोत्सवात २३३ जादा गाड्या सोडण्यात आल्याची माहिती या सभेत देण्यात आली. टेलिफोन अंतर्गत आरे येथील टॉवर बीएसएनएलचा असून, अन्य कंपनीला कसा वापरायला दिला? असा सवाल यावेळी करण्यात आला. कृषी विभागाकडे मोठी यंत्रणा असताना किती बंधारे बांधणार याचा अद्याप अहवाल का देत नाही तसेच पक्के बंधारे बांधण्यासाठी अद्याप सर्वेक्षण का केले नाही? प्रत्येक खाते ही सर्वच आमची जबाबदारी नाही असे म्हणून जबाबदारी झटकत असल्याने धोपावे, साखरी त्रिशूळ हे अशा कामाने टंचाईमुक्त घेऊ शकत नाहीत, असे सभापती राजेश बेंडल यानी स्पष्ट केले. २०६ पैकी १०९ शाळांमधून ई-लर्निंग व ६२ अप्रगत विद्यार्थ्यांविना शाळा असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी डी. डी. इरनाक यानी दिली. आरोग्य विभागांतर्गत कुटुंबकल्याण उद्दीष्ट ४२ टक्के पूर्ण असल्याची माहिती डॉ. सांंगवीकर यांनी दिली.
या सभेत अन्य विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. अनेक विषयांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.
यावेळी सभापती राजेश बेंडल, उपसभापती सुरेश सावंत, गटविकास अधिकारी बी. ई. साठे, सदस्य सुनील जाधव, विलास वाघे, पांडुरंग कापले, संपदा गडदे, गायत्री जाधव, पूनम पाष्टे, सुचना बागकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Officer regarding the Gharkul scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.