शून्य पटसंख्येच्या शाळांची संख्या घटणार

By Admin | Updated: July 13, 2015 00:36 IST2015-07-12T23:07:41+5:302015-07-13T00:36:16+5:30

जिल्हा परिषद : शाळाबाह्य सर्वेक्षण मोहिमेचा फायदा ?

The number of schools in zero percent will decrease | शून्य पटसंख्येच्या शाळांची संख्या घटणार

शून्य पटसंख्येच्या शाळांची संख्या घटणार

रत्नागिरी : इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांकडे पालकांचा कल वाढत असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना गळती लागली आहे. दरवर्षी शून्य पटसंख्येच्या शाळांमध्ये वाढ होत असलेली दिसून येत आहे. मात्र, शासनातर्फे राबविण्यात आलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण मोहिमेमुळे त्यांना शालेय प्रवाहात सामील करून घेण्यात येत आहे. या उपक्रमामुळे यावर्षी शून्य पटाच्या शाळांची संख्या कमी होणार असल्याचे आशादायी चित्र दिसू लागले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात २७४६ प्राथमिक शाळा आहेत. २०१४-१५मध्ये शून्य ते पाच पटसंख्या असलेल्या शाळा १६६ आहेत. ६ ते १० पटसंख्या असलेल्या शाळा ३०८ इतक्या आहेत. ११ ते १५ पटसंख्या असलेल्या शाळा ३५९ तर १६ ते २० पटसंख्या असलेल्या शाळा ३३७ इतक्या आहेत.
ही संख्या गतवर्षीची असली तरी पटसंख्येची खरी आकडेवारी पटपडताळणीनंतर सप्टेंबरपर्यंत स्पष्ट होईल. परंतु शाळाबाह्य सर्वेक्षणामुळे मुलांना शाळेच्या प्रवाहात आणल्यामुळे कमी पटसंख्येत काही अंशी का होईना निश्चितच भर पडली आहे.
शासनातर्फे शाळाबाह्य मुलांसाठी राबवण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातून ३२८ शाळाबाह्य मुले सापडली. त्यामध्ये १८६ मुलगे, तर १३२ मुलींचा समावेश आहे. मंडणगड तालुक्यात ३७, दापोली ३०, खेड १६, गुहागर ८४, चिपळूण ४२, संगमेश्वर १९, रत्नागिरी ४६, लांजा ८, राजापूर १३, रत्नागिरी शहर १३ मिळून एकूण ३३८ शाळाबाह्य मुलांची नोंदणी करण्यात आली आहे.
या विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांमधून प्रवेश देऊन बसविणे सुरू आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांच्या एकूण पटसंख्येत ३२८ विद्यार्थ्यांची वाढ झाल्यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. शून्य पटसंख्येमुळे शाळेतील शिक्षकांना समायोजित करावे लागते. त्यामुळे शिक्षकही पटसंख्या ढासळू नये, यासाठी घरोघरी जाऊन पालकांची मनधरणी करत आहेत. (प्रतिनिधी)

रत्नागिरी जिल्ह्यात २७४६ प्राथमिक शाळा.
२०१४-१५मध्ये शून्य ते पाच पटसंख्या असलेल्या शाळा १६६.
सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातून ३२८ शाळाबाह्य.
शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांमधून प्रवेश देण्याचे काम सुरु.

Web Title: The number of schools in zero percent will decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.