रुग्णसंख्या घटताच जिल्ह्यातील २७ कोविड सेंटर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST2021-09-05T04:35:18+5:302021-09-05T04:35:18+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काेविड सेंटर बंद करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ...

रुग्णसंख्या घटताच जिल्ह्यातील २७ कोविड सेंटर बंद
रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काेविड सेंटर बंद करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३५ पैकी ८ कोविड केंअर सेंटर सुरु असून, उर्वरित २७ केंद्र बंद करण्याचा निर्णय आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार बाधित उपचाराखाली असून, जिल्हा कोविड रुग्णालयासह ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
रुग्णसंख्या वाढताच पहिल्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानंतर अनेक काेविड केअर सेंटर बंद करण्यात आली हाेती. मात्र, जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत दिवसाला पाचशे बाधित रुग्ण सापडू लागले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा कोविड रुग्णालयासह (महिला रुग्णालय) जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराची व्यवस्था केली गेली. तालुकास्तरावर उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांवर खाटांची व्यवस्था केली. तरीही उपचारासाठी बेड कमी पडू लागले हाेते. त्यामुळे मार्च महिन्यात पुन्हा काेविड सेंटर सुरु करण्यात आली. रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्यात वाढ केली गेली.
जिल्ह्यात अशी सुमारे ३५ काेविड सेंटर सुरु झाली होती. कमी लक्षणे असलेले आणि लक्षणेविरहीत बाधितांना तिथे ठेवण्यात येत होते. गंभीर असलेल्यांना जिल्हा कोविड सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील कोरोनाबाधित सापडण्याचा दरही कमी झाला आहे. बरे होणाऱ्यांचा टक्का ९५.४८ टक्केवर पोहाेचला आहे. कोविड केअर सेंटरमधील बाधितांची संख्या कमी झाल्यामुळे जिल्ह्यात निर्माण केलेली २७ केंद्र बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या दापोली १, खेड १, संगमेश्वर १ आणि रत्नागिरीत ५ केंद्र सुरु आहेत. दरम्यान, तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून वेळ पडल्यास ही केंद्र पुन्हा सुरु करण्याची तयारीही ठेवल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.