रत्नागिरी : काेराेनाने एकाच कुटुंबातील सख्ख्या भावांचा संसार फुलत असतानाच उद्ध्वस्त केला. एका महिन्याच्या आतच दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. रत्नागिरीतील फोटोग्राफर अजय चव्हाण व त्याचा लहान भाऊ अमित चव्हाण या दोघांचेही काेराेनामुळे निधन झाले आणि त्यांचे चिमुकले वडिलांच्या प्रेमापासून दुरावले. अजय व अमित हे रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकातून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस निरीक्षक वसंतराव चव्हाण यांचे नातू होते.
रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करुन उच्चशिक्षण घेतल्यानंतर मोठा अजय चव्हाण हा फोटोग्राफी क्षेत्रात उतरला तर लहान भाऊ अमित इंजिनिअर होऊन नेव्हीमध्ये सेवेत होता. दोघांचाही विवाह झाला होता. अमितला एक चिमुकला मुलगा तर अजयला एक दहा वर्षांची मुलगी तर ४ वर्षांचा मुलगा आहे. दोघांचेही संसार फुलत असतानाच काेराेनाच्या दुष्टचक्राने त्यांचा संसार उद्ध्वस्त केला.
अमित हा एप्रिल महिन्यात रायगडहून रत्नागिरीत आल्यानंतर आजारी पडला. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच दि. २९ एप्रिलला त्याचा मृत्यू झाला. अमितच्या मृत्यूच्या संकटातून कुटुंब सावरत असतानाच अजयलाही कोरोनाची लागण झाली. सुरुवातीला त्याच्या तब्बेतीत फरक पडत असतानाच अजयची तब्बेत पुन्हा खालावली. त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असतानाच अजयचीही प्राणज्योत मालवली.
दोन सख्ख्या भावांचा एका महिन्याच्या आतच लागोपाठ मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजय चव्हाण हा फोटोग्राफर होता. त्यामुळे रत्नागिरीतील सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी त्याचे जवळचे संबंध होते. शाळेतील मित्रांच्या ग्रुपमध्ये अजय आजही मिसळत असे. त्याने शाळेपासूनची मैत्री घट्ट बांधून ठेवली होती. त्यामुळे अजयच्या अचानक जाण्याने त्याच्या मित्रपरिवारालाही धक्का बसला आहे.