पक्षातील विरोधकांबाबत आता ठोस भूमिका

By Admin | Updated: December 3, 2015 23:47 IST2015-12-03T23:05:37+5:302015-12-03T23:47:43+5:30

शेखर निकम : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप

Now a solid role about the opponents of the party | पक्षातील विरोधकांबाबत आता ठोस भूमिका

पक्षातील विरोधकांबाबत आता ठोस भूमिका

चिपळूण : येथील नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. काँग्रेसने निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर युती करूनच निवडणुका लढवल्या. मात्र, आता सत्ताधाऱ्यांविरोधात काही नगरसेवक आरोप करीत आहेत. आता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. स्वीकृत नगरसेवक इनायत मुकादम हे पक्षाविरोधात काम करीत आहेत, त्यांच्याबाबत ठोस भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी गुरुवारी येथे दिला.
शहरातील पाग महिला विद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, विद्यार्थी संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप माटे, युवक अध्यक्ष मयुर खेतले, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष कमाल बेबल, नगरसेवक सुचय रेडीज, शौकत परकार आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विविध क्षेत्रात काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील पवार यांचा सल्ला घेतात. पक्षसंघटना वाढीसाठी सर्वांनी मिळून काम करायला हवे. शरद पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. इतर क्षेत्रात काम करणाऱ्यांपर्यंत आपण पोहोचले पाहिजे. नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. यासाठी गावागावात पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा. दि. २० डिसेंबर रोजी पुणे येथे राष्ट्रवादीची जाहीर सभा होणार आहे. अंदाजे ३ लाख लोक या सभेत उपस्थित राहणार आहेत, असे निकम यांनी सांगितले. पक्षबांधणीच्या दृष्टीने तळागाळातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्हाला एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नाही हे विसरून पक्षबांधणीच्या दृष्टीने काम करायचे आहे. सध्या पंतप्रधान मोदींची लाट ओसरत चालली आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी जागरूक होऊन आवाज उठवला पाहिजे. सरकारने स्कॉलरशिप कमी केली आहे. अनेक प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहेत. यासाठी रस्त्यावर उतरण्याची आता वेळ आली आहे.
दि. २४ ते २७ डिसेंबर दरम्यान सावर्डे येथे राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा व आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. अशा धर्तीवर वाडीवाडीत, नगर परिषद हद्दीत, गावपातळीवर विविध उपक्रम राबवून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे निकम म्हणाले. (वार्ताहर)

आगामी निवडणुकीसाठी आपणाला सामोरे जायचे आहे. त्यादृष्टीने कामाला लागले पाहिजे. सत्ता नसेल तर विकासासाठी निधी मिळणार नाही. पक्षाला शोभेल, असे काम करायचे आहे. सर्वांना विश्वासात घेऊनच पक्ष वाढविला पाहिजे. सध्या पक्षाला विविध ठिकाणी चांगले यश मिळत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी सांगितले.

Web Title: Now a solid role about the opponents of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.