राज्यातील अंगणवाडी सेविकांवर आता कुपोषणाचे ओझे

By Admin | Updated: October 1, 2014 01:06 IST2014-10-01T00:51:33+5:302014-10-01T01:06:48+5:30

तीव्र नाराजी : आधीच कामाचा ताण त्यात आणखी एक जबाबदारी

Now the burden of malnutrition on the Aanganwadi sevikas in the state | राज्यातील अंगणवाडी सेविकांवर आता कुपोषणाचे ओझे

राज्यातील अंगणवाडी सेविकांवर आता कुपोषणाचे ओझे

श्रीकांत चाळके / खेड
अंगणवाडीतील मुलांचे आरोग्य उत्तम राहावे, याकरिता राज्य सरकारने विविध उपक्रमांचा अवलंब केला आहे. मूठभर धान्य योजनेच्या माध्यमातून या मुलांच्या प्रकृतीला आकार देणे आणि त्याद्वारे कुपोषण टाळणे, हे काम आता अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे.
कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने आता मूठभर धान्य योजना आणली आहे. हे धान्य गावात फिरून या सेविकांनी जमवायचे आहे आणि यापासून पोषण आहार बनवून तो विद्यार्थ्यांना खाण्यास द्यायचा आहे़ ही सारी जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे, हे कमी म्हणून की काय? गावात ग्रामस्थांच्या बैठका घेऊन कुपोषणाचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि त्याविषयी जनजागृती करणे आदी कामे याच सेविकांनी करावयाची आहेत. यामुळे अध्ययनाच्या कामाकडे दुर्लक्ष होणार होत आहे़ या मुलांच्या अध्ययनाची आणि परिपक्वतेची जबाबदारी सरकारने घ्यावी, असा सूर अंगणवाडी सेविकांमधून आळवला जात आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या २८३१ अंगणवाड्यांतील बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते. जिल्ह्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील १ लाख ५ हजार २७४ बालके आहेत. त्यातील ३१६ बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे. खेडमध्ये तर हे प्रमाण अवघे १ आहे़
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने कुपोषणाचे हे प्रमाण अत्यल्प असले तरी चिंताजनक आहे़ आवश्यक कॅलरीज आणि पोषक तत्व यांची निरंतर कमतरता किंवा असंतुलन यामुळे मुले कुपोषित राहतात. कमी वजनाची मुले जन्माला येणे, आहार व संगोपनाच्या चुकीच्या पध्दती, अतिसार, न्यूमोनिया, रक्तात लोहाची कमतरता, अ जीवनसत्त्वाची कमतरता, अपूर्ण लसीकरण आणि जंत ही कुपोषणाची प्रमुख कारणे आहेत.
प्रकृतीने अशक्त असलेल्या मुलांना पोषक पदार्थ सध्या अंगणवाड्यांमधून पुरविले जात आहेत़ तसेच संबंधित मुलांची तपासणीही तज्ज्ञांकडून केली जाते़ या मुलांसाठी हवा तितका खाऊदेखील अंगणवाडीमध्ये ठेवण्यात आला आहे. आता यामध्ये मूठभर धान्य योजनेची भर पडली आहे़ या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांनी गावात जाऊन धान्य जमा करायचे आहे़ या जमा झालेल्या धान्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करून ते मुलांना खायला द्यायचे आहेत. याची विविध प्रात्यक्षिकेही ग्रामस्थांना वेळोवेळी दाखवायची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर पडली आहे़ दिवसभर या सेविकांना मुलांच्या खाद्याच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे लागणार असून, अध्ययनाच्या कामाकडेही दुर्लक्ष होत आहे. मूठभर धान्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये ग्रामस्थांमध्ये अद्याप संभ्रम आहे. बहुतांश गावांमध्ये गटतटाचे राजकारण असल्याने किती ग्रामस्थांकडून योजना अंमलबजावणीमध्ये सहकार्य मिळते, त्यावरच योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now the burden of malnutrition on the Aanganwadi sevikas in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.