गोंधळाबाबत प्रशासनाला नोटीस देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:56+5:302021-05-12T04:32:56+5:30
रत्नागिरी : लसीकरणाबाबत मंगळवारी रत्नागिरीत झालेला गोंधळ हा ढिसाळ कारभारामुळे झाला आहे. यात तात्काळ सुधारणा झाली नाही, तर आपत्ती ...

गोंधळाबाबत प्रशासनाला नोटीस देणार
रत्नागिरी : लसीकरणाबाबत मंगळवारी रत्नागिरीत झालेला गोंधळ हा ढिसाळ कारभारामुळे झाला आहे. यात तात्काळ सुधारणा झाली नाही, तर आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५९ व ६० (ब) चा वापर करून जिल्हा प्रशासनावर कायदेशीर कारवाईसाठी राज्य शासनाकडे नोटीस पाठविली जाईल, असा इशारा भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिला आहे.
मंगळवारी ४५ च्या पुढील वयोगटातील नागरिकांना मिस्त्री हायस्कूलमध्ये दुपारी ही लस मिळणार होती. दुसरा डोस असल्याने पूर्वनोंदणी नव्हती. त्यामुळे नागरिकांनी सकाळपासून केंद्रावर गर्दी केली. उन्हामध्ये नागरिक उभे होते. प्रचंड गोंधळ आणि गर्दीचे वातावरणात होते. २०० डोस उपलब्ध होणार होते, प्रत्यक्षात ४०० पेक्षा अधिक नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी गेले. त्यामुळे खूप गोंधळ झाला. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
प्रशासनाचा ढिसाळ कारभार नागरिकांच्या त्रासाचे कारण बनत आहे. प्रशासकीय यंत्रणेमध्ये कोणताही समन्वय नाही. लसीकरणातील अडचणी अधिकाऱ्यांनी समजून घेतलेल्या नाहीत. उन्हापासून त्रास होतो म्हणून साधा मंडप घालण्याची व्यवस्थाही प्रशासन करीत नाही, हे दुर्दैव आहे. वारंवार मागणी करून त्यात बदल होत नाही. कारण प्रशासनावर अंकुश ठेवणारी राजकीय व्यवस्था अस्तित्वात नाही. पालकमंत्र्यांनी दुर्लक्षित केलेला हा दुर्दैवी जिल्हा आहे. पूर्वनियाेजनाचा अभाव, जबाबदाऱ्यांची अस्पष्ट वाटणी, जनतेच्या अडचणींची दखल न घेता कागदोपत्री काम करण्याची पद्धती या साऱ्यामुळे जनतेला त्रास होत आहे, अशी खंत त्यांनी मांडली आहे.
गावोगावी नेटवर्क नाही, जुन्या लोकांना नोंदणी प्रक्रियेची तांत्रिक माहिती नाही, अशा लोकांना मार्गदर्शन नाही, लसीची नेमकी उपलब्धता किती, याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक नाही. असा सर्व अधांतरी व स्वैर कारभार सुरू आहे. यात तात्काळ सुधारणा झाली नाही, तर कायदेशीर कारवाईसाठी राज्य शासनाकडे नोटीस पाठविली जाईल. भारतीय जनता पार्टी यासंदर्भात अत्यंत गंभीर असून, जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही. आंदोलन करता येत नसले तरी कायद्याची दारे उघडी आहेत. आम्ही तो मार्ग जनतेसाठी अवलंबू, असा इशारा ॲड. पटवर्धन यांनी दिला आहे.