नुकसान भरपाईसाठी महावितरणला नोटीस

By Admin | Updated: February 15, 2015 23:39 IST2015-02-15T22:20:38+5:302015-02-15T23:39:54+5:30

कृषी समितीचा निर्णय : वेळीच जोडणी न दिल्याने शेतीपंप नादुरुस्त

Notice to Mahavitaran for losses | नुकसान भरपाईसाठी महावितरणला नोटीस

नुकसान भरपाईसाठी महावितरणला नोटीस

रत्नागिरी : मुख्यमंत्री विशेष कृती कार्यक्रमाची महावितरणने ‘एैसी की तैसी’ केली असून, दोन वर्षे उलटली तरी अजूनही विद्युपंपाना कनेक्शन दिलेले नाही. त्यामुळे विद्युतपंप नादुरुस्त झाल्याने नुकसान भरपाई का मागण्यात येऊ नये, अशी नोटीस जिल्हा परिषद कृषी समितीने महावितरणला पाठवण्याच्या निर्णय घेतला आहे. शासनाकडून अनुसूचित जाती, नवबौध्दांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामध्येच यातील गरीब व गरजू शेतकऱ्यांसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत विद्युत कनेक्शन व विद्युत पंप बसविण्याची योजना मागील पाच वर्षांपासून राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर विद्युतपंप देण्यात आले आहेत. या विद्युतपंपाना मुख्यमंत्री विशेष कृती कार्यक्रमांतर्गत वीजपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रोजगार हमी योजनेतून सन २०१२-१३ जिल्ह्यातील १९३ शेतकऱ्यांना विद्युत पंप वाटप करण्यात आले होते. या विद्युतपंप वीज कनेक्शन जोडणीसाठी मुख्यमंत्री विशेष कृती कार्यक्रमांतर्गत शासनाकडून महावितरणकडे नियमाप्रमाणे पैसेही भरणा करण्यात आले आहेत. ही वीज कनेक्शन जोडण्यासाठी महावितरणकडे १८४ शेतकऱ्यांनी मागणी अर्जही केले आहेत. त्यापैकी ९ शेतकऱ्यांनी अद्यापही अर्ज केलेले नाहीत. वीज कनेक्शनच्या मागणी केलेल्या १८४ शेतकऱ्यांपैकी केवळ ५६ शेतकऱ्यांनाच महावितरणकडून वीज कनेक्शन दिलेली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना अद्यापपर्यत जोडण्याच दिलेल्या नाहीत. त्यामुळे हे पंप नादुरुस्त झाले आहेत.
यामध्ये रत्नागिरी विभागातील ७८ कनेक्शन, चिपळूण विभागातील २९ कनेक्शन व खेड विभागातील २१ कनेक्शन अशी एकूण १२८ कनेक्शन महावितरणकडून जोडण्यात आलेली नाहीत.सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात शासनाने संबंधित कनेक्शन जोडणीसाठी महावितरणकडे पैसे भरूनही ती जोडणी केलेली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी कनेक्शन जोडणीच्या मागणीसाठी महावितरणचे उंबरठे झिजवले.
जिल्हा परिषदेच्या कृषी समिती, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेमध्येही अनेकदा या वीज जोडणीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या सभांमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांकडून धारेवर धरण्यात आले होते. तरीही महावितरणकडून त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे महावितरणबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दोन वर्षे उलटली तरी महावितरणने कनेक्शन दिलेली नसल्याने शेतकऱ्यांना देण्यात आलेले विद्युत पंप पडून आहेत. त्यामुळे ते पंप आता नादुरूस्त झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीत जोरदार चर्चा झाली. या नुकसानीस महावितरणच जबाबदार असल्याचा सूर या सभेत सदस्यांकडून निघाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई का मागण्यात येऊ नये, अशी नोटीस महावितरणला देण्याचा निर्णय कृषी समितीने घेतला आहे. याबाबत लवकरच महावितरणला नोटीस बजावण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)

सतीश शेवडेंची नाराजीजिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व कृषी समिती सभापती सतीश शेवडे यांनी महावितरणच्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरणने शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अशी मागणी असल्याचे शेवडे यांनी सांगितले. याबाबत होणाऱ्या निर्णयाकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Notice to Mahavitaran for losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.