सच्चेपणाला किंमतच नाही?
By Admin | Updated: October 12, 2014 00:52 IST2014-10-12T00:48:09+5:302014-10-12T00:52:05+5:30
निष्ठावानांची गोची: शिवसैनिकांमधून उमटत आहेत तीव्र प्रतिक्रिया

सच्चेपणाला किंमतच नाही?
रत्नागिरी : काल-परवा ज्यांनी ‘जातीयवादी’ पक्ष म्हणून हिणवले, ज्यांनी केवळ विरोधी पक्ष आहे म्हणून प्रत्येक उपक्रमावर टीकास्त्र सोडले, त्यांना केवळ पक्षप्रवेश करताच आमदारकीची आॅफर आणि निष्ठावंतांच्या पाठीत लाथ, हा न्याय कोणता, असा सवाल आता शिवसेनेतूनच केला जात आहे. माजी राज्यमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या राष्ट्रवादीतील फौजेच्या शिवसेना प्रवेशानंतर शिवसेनेतील निष्ठावान कार्यकर्त्यांची गोची झाली असल्याच्या प्रतिक्रिया शिवसैनिकांमधून उमटत आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ज्यांचे भावनिक नाते जुळले होते आणि ज्यांनी त्यांची हयात शिवसेनेसाठी घालवली त्यांना मागे सारुन दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या उमेदवाराला थेट ‘खुर्चीची’ आॅफर दिल्याबद्दल सेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
शिवसेनेतील एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने लोकमतशी आपल्या भावना व्यक्त करताना आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पक्षांतराने ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली व त्यांच्याबरोबर जी काही प्यादी शिवसेनेत आली, त्यांचे पारडे आता जड झाले आहे, आम्ही मात्र चार पावले दूर गेलो आहोत. निदान आमची मतं तरी जाणून घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्याने दिली आहे.
ज्या हेतूने आणि ज्या निष्ठेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची उभारणी केली आहे, त्यालाच आता हरताळ फासला जात आहे. सामंत यांच्यासोबत असलेली मोठी फौज ही शिवसेनेसाठी कायमचे दुखणे होऊ शकते. ज्यांच्यावर अनेक आरोप आहेत आणि त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त शिवसेनेनेच केले आहेत, त्यांना आता शिवसेनाच आपल्यात सामावून घेते आणि निष्ठावानांना दूर सारते, हा कुठला न्याय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या निवडणुकीत सेनेचा विजय झाला तर केवळ उमेदवार विजयी होईल आणि त्यांचे समर्थक मोठे होतील, पण सामान्य कार्यकर्त्यांचे काय? असा प्रश्न या कार्यकर्त्याने केला. त्यामुळे वरकरणी सारं आलबेल असलं तरीही ‘अंदर की बात कुठ और है’, असंच चित्र सध्या दिसत आहे. (प्रतिनिधी)
४एकनिष्ठ शिवसैनिकांचा सवाल
४सामंतांच्या उमेदवारीमुळे निष्ठावानांना धक्का
४थेट खुर्चीची आॅफर दिल्याने सेनेत तीव्र प्रतिक्रिया
४निष्ठेला फासला जातोय हरताळ
४अंदर की बात कुछ और...
४ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून तीव्र भावना
४प्रवेशांनतरचे कवित्व सुरूच...
४काय घडणार याकडे लक्ष
कोणता झेंडा घेऊ हाती?
बाळ माने यांना विधानसभा निवडणुकीत दोनवेळा पराभव पत्करावा लागला, तो पराभव का झाला, हे भाजपपेक्षा जास्त शिवसेनेला माहिती आहे. पण तरीही त्यांनी पक्षत्याग केला नाही. उलट ते त्याच पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करत राहिले. त्यामुळे आता ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा सवाल तेकरीत आहेत.