वर्षात जमलं नाही, ते आठवड्यात झालं
By Admin | Updated: July 3, 2014 00:36 IST2014-07-03T00:31:26+5:302014-07-03T00:36:00+5:30
जिल्हा परिषद : निलंबनाच्या कारवाईनं सगळं जमवलं !

वर्षात जमलं नाही, ते आठवड्यात झालं
रत्नागिरी : कारवाईचा बडगा उगारला की, कर्मचाऱ्यांचा कामाचा ‘उत्साह’ किती वाढू शकतो, हे ग्रामसेवकांच्या ‘शक्ती’ने दाखवून दिले आहे. जन्म-मृत्यू नोंदीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ग्रामसेवकांना निलंबित करताच उर्वरित ग्रामसेवकांनी ताकद पणाला लावली आणि दोन वर्षे रखडलेले काम केवळ आठवडाभरात पूर्णत्त्वाकडे नेताना चक्क ४ लाख जन्म-मृत्यूच्या नोंदीचे संगणकीकरण केले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा उगारताच आठवडाभराच्या कालावधीत सुमारे ४ लाख जन्म-मृत्यू नोंदीचे संगणकीकरण करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ग्रामसेवक कारवाईच्या धसक्याने ग्रामपंचायतींमधील जन्म-मृत्यू संगणकीकरणाच्या कामात व्यस्त आहेत. जे काम गेल्या दोन वर्षांत झाले नाही, ते केवळ एका आठवड्यात कसे झाले, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. जिल्ह्यात ८४५ ग्रामपंचायती असून, त्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. या संगणकीकरणामुळेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची विकासकामे ई-टेंडरिंगने करण्यात येत आहेत. मात्र, अनेक ग्रामपंचायती त्यामध्येही चालढकल करीत असल्याने विकासकामांवर त्याचा परिणाम होत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.
सर्व ग्रामपंचायतींचे संगणकीकरण करण्यात आल्यानंतर जन्म-मृत्यूची नोंद संगणकीकृत करणे आवश्यक होते. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून जन्म-मृत्यूच्या केवळ दीड लाख नोंदी करण्यात आल्या होत्या. या नोंदींबाबतचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत नापसंती व्यक्त करुन कारवाईची धडक मोहीमच उघडली. त्यांनी याप्रकरणी चार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे ग्रामसेवकांसह जिल्हा परिषदेच्या इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्येही खळबळ उडाली होती. कारवाईच्या धडकेने ग्रामसेवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जन्म-मृत्यूच्या नोंदी आतापर्यंत केवळ दीड लाखापर्यंत संगणकीकृत करण्यात आल्या होत्या. मात्र, कारवाईनंतर या नोंदी संगणकीकरण करण्याच्या कामाला वेग आला असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवडाभराच्या कालावधीत सुमारे ४ लाख जन्म-मृत्यूच्या नोंदी संगणकीकृत करण्यात आल्या. आतापर्यंत जन्माच्या ४ लाख २८ हजार आणि मृत्यूच्या २ लाख ५४ हजार नोंदी करण्यात आल्या. (शहर वार्ताहर)