पाणीसंकट नाही
By Admin | Updated: July 4, 2014 00:12 IST2014-07-04T00:07:10+5:302014-07-04T00:12:14+5:30
एमआयडीसीचा दिलासा : कुवारबावसह सात ग्रामपंचायतींचा समावेश

पाणीसंकट नाही
रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरजोळे औद्योगिक वसाहतीबरोबरच परिसरातील सात ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांना आणखी पंधरा दिवस पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल, इतका पाणीसाठा हरचेरीसह अन्य धरणात आहे. त्यामुळे सध्यातरी पाणी कपातीचे कोणतेही संकट नाही, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, रत्नागिरी विभागाचे कार्यकारी अभियंता परशुराम करावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यामुळे कुवारबाव व परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
औद्योगिक वसाहतीसह रत्नागिरीतील कुवारबाव, नाचणे, पोमेंडी, शिरगाव, मिरजोळे, कर्ला व मिऱ्या ग्रामपंचायतींना एमआयडीसीकडून पूर्ण तर रत्नागिरी नगरपरिषदेला अंशत: पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी हरचेरी धरणातील पाणीसाठा मे महिन्यातच संपुष्टात आल्याने या सर्वच नळपाणी योजना संकटात सापडल्या होत्या. त्यातील काही ग्रामपंचायतींनी नागरिकांसाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था केली होती, तर काहींनी या क्षेत्रातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले होते.
या पार्श्वभूमीवर यंदा हरचेरी धरणातील पाणी स्थिती काय आहे, याची विचारणा केल्यावर करावडे बोलत होते.
येत्या १५ दिवसांत या सर्वच ग्रामपंचायतींच्या योजनांना दिल्या जाणाऱ्या पाण्यात कोणतीही कपात केली जाणार नाही. त्यानंतरही पावसाने पाठ फिरविल्याने पाणीसाठा कमी झालाच तर काही प्रमाणात पाणी कपातीचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, तशी स्थिती येईल, असे वाटत नसल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
एमआयडीसीमार्फत गेल्या वर्षीचे संकट लक्षात घेऊन त्यानंतर तातडीने पाणी साठवणुकीबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळेच यंदा पाणी स्थिती उत्तम राखता आली. सध्या रत्नागिरी एमआयडीसी क्षेत्राला ४ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात असून, रत्नागिरी नगरपालिकेला १.७ दशलक्ष लीटर्स पाणी पुरविले जात आहे. ग्रामपंचायतींना एक हजार लीटरला ७.५० रुपये दर आकारला जात आहे. उद्योगांना एक हजार लीटरला २५ रुपये दर आकारला जात आहे. (प्रतिनिधी)