...यापुढे कोणाचीही दहशत चालवून घेणार नाही

By Admin | Updated: October 18, 2015 23:57 IST2015-10-18T22:40:01+5:302015-10-18T23:57:01+5:30

राजन तेली : वेंगुर्लेतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी नितेश राणेंची सारवासारव

... no one will panic anymore | ...यापुढे कोणाचीही दहशत चालवून घेणार नाही

...यापुढे कोणाचीही दहशत चालवून घेणार नाही

वैभववाडी : केंद्रात आणि राज्यात भाजप, शिवसेनेची सत्ता असल्याने नगरपंचायतीचा विकास आम्हीच करु शकतो. आम्ही कोणाचीही दहशत जिल्ह्यात चालू देणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या भूलथापा आणि दहशतीला जनतेने बळी पडू नये, असे आवाहन करत वेंगुर्ले राड्याच्या परिणामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आमदार नितेश राणे व्यापाऱ्यांना बोलावून सारवासारव करत आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी शनिवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
येथील भाजप कार्यालयात तेलींनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, शिवसेना विधानसभा मतदारसंघ प्रमुख जयेंद्र रावराणे, सज्जनराव रावराणे, भाजप तालुकाध्यक्ष सुहास सावंत, सरचिटणीस राजेंद्र्र राणे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक रावराणे, राजन चिके, मंगेश लोके आदी उपस्थित होते.
तेली म्हणाले की, वेंगुर्लेतील राड्याची किंमत काँग्रेसला सावंतवाडी पालिकेतही मोजावी लागली होती. त्यामुळे तशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून काहीतरी वदवून घेतले गेले. परंतु, पोलीस आणि प्रशासनाने सज्जनरावांच्या धमकी प्रकरणाची योग्य दखल घेतली आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर व्हावी, अशी आमची इच्छा आहे. ७0 वर्षीय सज्जनराव बालिश? की त्यांना धमकवायला लावणारे बालिश? याचे उत्तर येथील जनता नक्कीच देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांना नगरविकासाची नस माहीत आहे. त्यामुळे नगरांच्या विकासाला पैसे कमी पडणार नाहीत असे धोरण राज्य सरकारने आणले आहे. त्यामुळे वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतींचा विकास व्हायचा असेल तर युतीच्या हातात येथील सत्ता असली पाहिजे. प्रत्येक वर्षात मिळणारे २ कोटी २00 गावांना वाटून आमदार राणे वैभववाडी नगरपंचायतीचा विकास कसा करणार? १५ वर्षे काँग्रेसची सत्ता असताना कणकवली नगरपंचायतीची किती आरक्षणे काँग्रेसने विकसित केली, असा सवाल करत सत्ता असताना जे शक्य झाले नाही ते विरोधी बाकांवर बसून विकास कसा करणार आहेत. याचा विचार मतदारांनी करावा, असे आवाहन तेली यांनी यावेळी बोलताना केले. (प्रतिनिधी)

...तर आश्चर्य वाटायला नको !
प्रभाग क्रमांक ३ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार कोंडीबा काळे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून त्यांच्या कुटुंबियांवर काँग्रेस दबाव टाकत आहे. त्यामुळे काळे कुटुंबिय सध्या दडपणाखाली आहे. परंतु, काळेंचे वडील जिल्हा बँकेचे कर्मचारी असल्याने तक्रार देऊ शकत नाहीत. त्यामुळे कोंडीबा काळे यांनी उद्या नामनिर्देशनपत्र मागे घेतले तर आश्चर्य वाटायला नको, अशी टीप्पणी राजन तेली यांनी केली.

Web Title: ... no one will panic anymore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.