दरापेक्षा एकही पैसा जादा नको

By Admin | Updated: February 18, 2015 23:49 IST2015-02-18T22:17:19+5:302015-02-18T23:49:37+5:30

‘लोकमत’च्या वृत्तानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून कडक सूचना

No money extra than the rate | दरापेक्षा एकही पैसा जादा नको

दरापेक्षा एकही पैसा जादा नको

रत्नागिरी : जुन्या शिधापत्रिका बदलून देताना त्या प्रचलित दरानेच देण्यात याव्यात, तशी सूचना रेशनदुकानदारांना द्या, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी नीता शिंदे- सावंत यांनी मंडणगड तहसीलदारांना आज केली.जीर्ण वा वापरण्यास योग्य नसलेल्या शिधापत्रिका बदलून देण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र, ही मोहीम मंडणगड तालुक्यात अद्याप राबवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे मंडणगड तहसीलदारांनी ही मोहीम हाती घेतली आहे. परंतु, ही मोहीम हाती घेताना केवळ जीर्ण झालेल्याच शिधापत्रिका बदलून देण्याऐवजी २०११ पूर्वी ज्यांनी शिधापत्रिका काढल्या आहेत, त्या सर्वांना आता नव्याने शिधापत्रिका काढाव्या लागतील, असे तालुक्यातील रेशनदुकानदारांनी लोकांना सांगून वीस ते चाळीस रूपयांऐवजी शंभर रूपये घेण्यास प्रारंभ केला. विशेष म्हणजे याबाबत मंडणगड तालुका प्रशासनही याबाबत अनभिज्ञ होते. हे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध केले होते.
जिल्हा पुरवठा अधिकारी नीता सावंत यांच्याशी संपर्क साधून याबाबतची कल्पना देण्यात आली. त्यांनी तातडीने तहसीलदार कविता जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. २०११ पूर्वीच्या शिधापत्रिका बदलून देण्याची गरज नाही, तर ज्या जीर्ण झाल्यात किंवा वापर करण्यास अयोग्य आहेत, अशाच शिधापत्रिका नव्याने बदलून देण्यात याव्यात, यासाठी त्या शिधापत्रिकेच्या किंमतीपेक्षा तसेच त्यासाठी करावा लागणारा अर्ज, स्टँप, किरकोळ झेरॉक्सचा खर्च वगळून एकही रूपया जादा घेता कामा नये, अशी सूचना दुकानदारांना देण्यास सांगितले. यानुसार आता तहसीलदार जाधव यांनी लवकरच आपण बैठक घेणार असल्याचे शिंदे - सावंत यांना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: No money extra than the rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.