नोकरीचा नाही पत्ता, डी.एड. अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:35 IST2021-09-12T04:35:27+5:302021-09-12T04:35:27+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : दोन वर्षांचा डी.एड. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही नोकरीची ...

नोकरीचा नाही पत्ता, डी.एड. अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : दोन वर्षांचा डी.एड. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही नोकरीची शाश्वती नाही. खासगी संस्थेमध्ये अडीच ते तीन हजार रुपयांवर राबावे लागते, अन्यथा बेरोजगार म्हणूनच राहावे लागत असल्याने या अभ्यासक्रमासाठी अल्प प्रतिसाद लाभत आहे.
जिल्ह्यात दोन अनुदानित व चार विनाअनुदानित डी.एड. महाविद्यालये होती. त्यापैकी गेल्या पाच-सहा वर्षांतील विद्यार्थी गळतीमुळे दोन विनाअनुदानित महाविद्यालये बंद झाली आहेत. त्यामुळे दोन अनुदानित व दोन विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये एकूण २४० प्रवेश क्षमता असताना आतापयर्यंत ७८ प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत. एकूण विद्यार्थी क्षमतेपेक्षा आलेले अर्ज तुलनेने फारच कमी आहेत. डी.एड. करून नोकरीचा पत्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.
n दोन वर्षांचा अभ्यासक्रम
n नोकरीसाठी टीईटी परीक्षा सक्तीची
n टीईटी परीक्षेचा एक ते दोन टक्के निकाल
n २०१० नंतर शिक्षक भरती नाही
n २०१७ मध्ये ‘पवित्र पोर्टल’द्वारे राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया अद्याप रेंगाळली आहे.
n हजारो विद्यार्थी बेरोजगार
अन्य अभ्यासक्रमांना घेतला प्रवेश ..
डी.एड. अभ्यासक्रम पूर्ण करूनही नोकरी नाही. खासगी शाळांमध्येही अत्यल्प वेतनावर राबावे लागते, अन्यथा बेरोजगार म्हणून राहावे लागते. पदवीधर नसल्यामुळे कारकून म्हणूनही खासगी संस्थांमध्ये नोकरी दिली जात नाही. त्यामुळे डी.एड.ऐवजी पदवीसाठी प्रवेश घेतला आहे.
- रोहन पवार, रत्नागिरी
नोकरीसाठी टीईटी परीक्षा सक्तीची केली आहे. २०१० नंतर भरती झालीच नाही. २०१७ मध्ये ‘पवित्र पोर्टल’द्वारे शासनाकडून भरती प्रक्रिया राबविण्यात आली; मात्र अद्याप रखडली आहे. व्यावसायिक काैशल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी तरी मिळते म्हणून आयटीआयला प्रवेश घेतला आहे.
- शर्मिष्ठा पाटील, देवरूख
मुदतवाढ आवश्यक होती...
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेने यावर्षी चांगला प्रतिसाद आहे. यावर्षी बारावीचा चांगला निकाल लागल्याने डी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश वाढतील अशी अपेक्षा होती. मात्र, शासनाकडून प्रवेशासाठी दिलेली मुदत संपली आहे.
- नेताजी कुंभार, प्राचार्य, स. रा. देसाई. अध्यापक विद्यालय, रत्नागिरी.
बारावीचा निकाल चांगला लागला; मात्र या मुलांचे गुणपत्रक व लिव्हिंग सर्टिफिकेट उशिरा प्राप्त झाले. डी.एड. प्रवेशासाठी मात्र दि. ९ ते दि. २२ ऑगस्टपर्यंतच मुदत होती. त्यामुळे इच्छा असून, विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले.
- आर. बी. कांबळे, प्राचार्य, राजाभाऊ रेडीज अध्यापक विद्यालय, सावर्डे