जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही, २५६ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST2021-07-30T04:33:59+5:302021-07-30T04:33:59+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने दररोज मृतांचा आकडा वाढत होता. मात्र, गुरुवारी जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ...

जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही, २५६ नवे रुग्ण
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने दररोज मृतांचा आकडा वाढत होता. मात्र, गुरुवारी जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. बाधित २५६ रुग्ण सापडल्याने एकूण संख्या ७१,०४९ रुग्ण झाले आहेत. ३१६ बाधित रुग्णांनी मात केल्याने कोरोनामुक्तांची संख्या ६६,८१५ झाली आहे.
गेल्या महिन्यात एकही दिवस कोरोना रुग्णाच्या मृत्यूशिवाय गेलेला नाही. त्यामुळे बाधितांच्या संख्येसह मृतांची संख्याही वाढलेली आहे. जिल्ह्यात होमआयसोलेशनमध्ये १,०७३ बाधित रुग्ण असून ऑक्सिजनवर १५९ रुग्ण आहेत. वेगवेगळ्या रुग्णालयातील आयसीयूमध्ये ७६ बाधित रुग्ण ठेवण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कोरोना चाचण्या करण्याचे प्रमाण कमी झाल्याने बाधित रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. जिल्ह्यात ५,७९७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत १६५ रुग्ण तर ॲन्टिजन चाचणीत ९१ बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात १० रुग्ण, दापोलीत २१, खेडमध्ये ४१, गुहागरात ३६, चिपळुणात २७, संगमेश्वरात ३१, रत्नागिरीत ५४, लांजात ३ आणि राजापुरात ३३ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात लक्षणे नसलेले बाधित रुग्ण १,५३१ असून लक्षण असलेले रुग्ण ४६० आहेत. जिल्ह्याचा कोरोनामुक्तीचा दर ९४.४ टक्के आहे.