विश्वासात न घेता कोणताही उपक्रम राबवू नये

By Admin | Updated: September 15, 2015 00:03 IST2015-09-14T23:55:54+5:302015-09-15T00:03:13+5:30

चिपळूण पंचायत समिती सभा : सदस्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना धरले धारेवर

No action should be taken without believing in the faith | विश्वासात न घेता कोणताही उपक्रम राबवू नये

विश्वासात न घेता कोणताही उपक्रम राबवू नये

चिपळूण : मानस किंवा अन्य कोणत्याही संस्थेतर्फे प्रगत, अप्रगत विद्यार्थ्यांसाठी ११ ते ५ या वेळेत कोणताही उपक्रम न राबवता केवळ ज्ञानदानाचे काम व्हावे. सभागृहाच्या परवानगीशिवाय व कोणाच्याही लेखी आदेशाशिवाय गटशिक्षणाधिकाऱ्यांनी परस्पर निर्णय घेऊ नये, शाळा, आरोग्य केंद्रांच्या इमारतीसह अनेक शासकीय पडीक जागांवर सामाजिक वनीकरण विभागाने लागवड करावी, असे निर्णय घेण्यात आले.
चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सभापती समीक्षा बागवे यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार) मासिक बैठक झाली. यावेळी उपसभापती सुचिता सुवार व गटविकास अधिकारी शुभांगी पाटील उपस्थित होत्या.
सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्ष लागवड केवळ कागदोपत्री दाखवली जाते. गेल्या १० वर्षात ५ ते ६ हजार झाडांची लागवड झाली. हे केवळ लागवड करतात, पण झाडांच्या संरक्षणासाठी यांच्याकडे कोणतीच उपाययोजना नाही. यांची मानसिकताच बदलत नाही. आधी ती मानसिकता बदला, असे सदस्य सुरेश खापले यांनी सांगितले.
आरोग्य विभागाचा आढावा घेताना सध्या साथींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ओपीडी वाढली आहे. गणेशोत्सव असल्याने मुंबईकर गावी येणार आहेत. याबाबत काय उपाययोजना केली, हे सांगण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी येथे हजर हव्या होत्या. पण, त्या रत्नागिरी येथे बैठकीला गेल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त करून त्यांना नोटीस बजावून खुलासा मागावा, असे ठरले. कुटरे गावी आदिवासी महिलेचे प्रसुतीच्या वेळी निधन झाले, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला, यावर चर्चा झाली. याप्रकरणी तेथील परिचारिकेवर जबाबदारी टाकण्यात आली. पण, याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी दोषी असल्याने त्यांच्यावरही कार्यवाही व्हावी. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावा, असे ठरले. संतोष चव्हाण यांनी हा विषय लावून धरला होता.
शिक्षण विभागाचा आढावा घेताना सत्ताधाऱ्यांसह विरोधी सदस्यांनीही गटशिक्षणाधिकाऱ्यांवर तोंडसुख घेतले.
या विषयावर गदारोळ उडाला. सदस्य संतोष चव्हाण, जितेंद्र चव्हाण, सुरेश खापले, अभय सहस्त्रबुद्धे, दिलीप मोरे, पूनम शिंदे यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. ज्ञानरचनासारखे उपक्रम स्वयंसेवी संस्थांतर्फे समांतर न राबविता ते जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात यावेत.
शालाबाह्य कामात शिक्षकांना अडकवू नका. शासनाच्या परिपत्रकाचा बाऊ करण्यापेक्षा ते समजून घ्या व त्याची अंमलबजावणी करा. सरसकट निर्णय घेऊ नये, असे सदस्यांनी सांगितले. मानस व अन्य संस्थांतर्फे सहापैकी पाच बीटमध्ये साहित्य पोहोचले.
यावर सदस्यांनी कडाडून हल्ला चढविला. असे उपक्रम पंचायत समितीच्या परवानगीशिवाय राबवले जाऊ नयेत. गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण यांनी सभापती किंवा कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता परस्पर संस्थांना परवानगी दिल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली व पुन्हा असे करू नका, असे सुनावले.
पंचायत समितीच्या या बैठकीत अन्य विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीत विरोधी सदस्य जास्तच आक्रमक दिसले. त्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: No action should be taken without believing in the faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.