दोन अपघातात नऊ जखमी; ४ गंभीर संगमेश्वरमध्ये सलग चौथ्या दिवशी चौथा अपघात

By Admin | Updated: May 11, 2014 00:06 IST2014-05-11T00:06:32+5:302014-05-11T00:06:32+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात नऊजण जखमी झाले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर

Nine injured in two accidents; 4th Crash: Fourth Accident In Fourth Day In The Sangameshwar | दोन अपघातात नऊ जखमी; ४ गंभीर संगमेश्वरमध्ये सलग चौथ्या दिवशी चौथा अपघात

दोन अपघातात नऊ जखमी; ४ गंभीर संगमेश्वरमध्ये सलग चौथ्या दिवशी चौथा अपघात

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात नऊजण जखमी झाले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे झायलो आणि पुंटो कार यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दोन्ही चालकांसह पाचजण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली तर देवरुख -संगमेश्वर मार्गावरील लोवले येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई-गोवा महामार्गावर उन्हाळी सुट्टीमुळे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महामार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. अपघातातील मृतांच्या संख्येसह जखमींची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सुट्टी घालविण्यासाठी संतोष बबन झोरे हे आपल्या कुटुंबासह झायलो (एमएच-०६-ए२-१४९९) घेऊन मुंबईहून सावंतवाडीच्या दिशेने निघाले होते. त्यांची गाडी हातखंबा पेट्रोल पंपाजवळून चालली होती. त्यावेळी विलास सखाराम दवंत हा पुंटो कार (एमएच-०९-पीएक्स-२१५३) घेऊन बांबवडे (कोल्हापूर) येथून रत्नागिरीकडे येत होता. हातखंबा पेट्रोलपंपासमोरील उतारावर दोन्ही गाड्यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. ही टक्कर एवढी जबरदस्त होती की, मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. दोन्ही गाड्यांचे बरेच नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये झायलो चालक झोरे यांच्यासह त्याची पत्नी सारिका संतोष झोरे (३५), दीड वर्षाची मुलगी देविका, सुुनिता दादू कोकरे (३५), सविता गंगाराम कोकरे (३२) हे जखमी झाले. या पाचही जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करुन सोडून देण्यात आले. पुंटो कार चालक विलास दवंत याला मुका मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला कोल्हापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दुसर्‍या अपघातात, सुपर स्प्लेंडर ही दुचाकी (एमएच-०८-पी-७७९१) घेऊन राजेंद्र महादेव कदम (४८) आंगवली हे संगमेश्वरातून आंगवलीला निघाले होते. यावेळी समोरुन येणारी मोटार सायकल (एमएच-०८-एए-२७१३) घेऊन लोवलेमधून मंगेश पड्ये (३९, लोवले) व दिलीप गोपाळ बाईत (२७) हे दोघे संगमेश्वरला जात होते. लोवलेदरम्यान त्यांची मोटारसायकल चुकीच्या बाजूला जाऊन कदम यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. दोघेही भरधाव असल्याने दोघांच्याही गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये राजेंद्र कदम व त्यांचा लहान मुलगा अथर्व कदम तसेच मंगेश पड्ये, दिलीप बाईत हे गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार वैद्यकीय अधीक्षक डॉ. भोये यांनी केले. या चौघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातातील लहानग्या अथर्वची प्रकृती गंभीर आहे. संगमेश्वर तालुक्यात सलग चौथ्या दिवशी झालेला हा चौथा अपघात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रवीराज फडणीस, हे. कॉ. एस. एम. लोटे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. (प्रतिनिधी/शहर वार्ताहर)

Web Title: Nine injured in two accidents; 4th Crash: Fourth Accident In Fourth Day In The Sangameshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.