चिपळूण : शहरातील गांधारेश्वर पुलावरून एका नवदाम्पत्याने वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी घडला. नीलेश रामदास अहिरे (२५), अश्विनी नीलेश अहिरे (२३, मूळ रा. साक्री, जि. धुळे, सध्या पाग नाका, चिपळूण) अशी या दाेघांची नावे आहेत. दिवसभर एनडीआरएफ पथकामार्फत त्यांचा शोध घेण्यात आला. दिवस मावळल्याने तो थांबविण्यात आला. आज गुरुवारी पुन्हा त्यांचा शोध घेण्यात येणार आहे.नीलेश आणि अश्विनी हे पती-पत्नी बुधवारी मोटारसायकलवरून गांधारेश्वर येथील मंदिरात दर्शनासाठी आले होते. तेथे दर्शन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. तो विकोपाला गेल्यानंतर दोघेही सकाळी ११ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशनकडे मोटारसायकलवरून निघाले. मात्र, त्यानंतर ते परत वळून गांधारेश्वर पुलावर आले. मोटारसायकल पुलावरच उभी करताच पत्नी अश्विनी हिने कोणताही विचार न करता पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेतली. त्यापाठोपाठ पती नीलेश यानेही पुलावरून नदीत उडी घेतल्याचे परिसरातील काही नागरिकांनी पाहिले.प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोवर पती-पत्नी दोघेही वाशिष्ठीच्या प्रवाहात बुडाले होते. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर एनडीआरएफ पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.गांधारेश्वर मंदिराच्या बाजूने एनडीआरएफचे पथक वाशिष्ठी नदीत उतरले. पथकाने त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ते दोघेही सापडले नाहीत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अहिरे कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.
मे महिन्यातच झाले होते लग्ननीलेश व अश्विनी यांचा विवाह ८ मे रोजी झाला होता. त्यांचा संसार फुलण्याआधीच कोमेजल्याची चर्चा तेथील नागरिकांमध्ये सुरू होती. नीलेश अहिरे याची चिपळुणातील हॉटेल स्वागतजवळ मोबाइल शॉपी आहे. दोघे पती-पत्नी पागनाका येथे राहत होते. नवदाम्पत्यामध्ये कशावरून वादाची अशी कोणती ठिणगी पडली, ज्यामुळे हा टोकाचा निर्णय घेतला, ही बाब मात्र अजून पुढे आलेली नाही.
एनडीआरएफ पथकाची तारांबळया घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफ पथकाला वाशिष्ठी नदीतून स्पीड बोट घेऊन जाण्यास जवळपास दीड तासाचा कालावधी लागला. शोध कार्यासाठीचे काही आवश्यक साहित्य तेथे नसल्याने पुन्हा ते आणण्यासाठी पथकातील जवान परत आल्यानंतर शोधमोहीम सुरू झाली.