शेळीपालनासाठी नवीन योजना
By Admin | Updated: September 17, 2014 22:25 IST2014-09-17T21:23:36+5:302014-09-17T22:25:44+5:30
शेळीपालनासाठी नवीन योजना

शेळीपालनासाठी नवीन योजना
अडरे : पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, चिपळूणमार्फत शेळीपालन योजना चालू आर्थिक वर्षात राबविण्यात येणार आहे. ही योजना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर ४० शेळ्या व २ बोकड असा गट पुरवठा करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत एकूण प्रकल्पाची किंमत ३ लाख रुपये आहे. त्यापैकी लाभार्थींना ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. लाभार्थी निवडीमध्ये ४० टक्के लाभार्थी धनगर समाजातील असावा व तसा जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. प्रकरण मंजूर झाल्यास लाभार्थीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी शेळी विकास महामंडळ, गोखले नगर, पुणे १६ येथून खरेदी करुन हा प्रकल्प उभारण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी शेळ्या खरेदी करणे, शेड निवारा, खाद्य, भांडी, शेडनेट औषध, लसीकरण, विमा, मुरघास टाकी, कडबाकुटी यंत्र, वैरण, बियाणे व प्रशिक्षण आदींचा समावेश आहे.
शेळ्या खरेदी समितीमार्फत खरेदी करण्यात येतील. लाभार्थींकडून रोख ५० टक्के स्वहिस्सा भरणे शक्य नसल्यास बँक किंवा वित्तीय संस्थेचे कर्ज घेता येईल. यासाठी लाभार्थींनी प्रयत्न करावे. या प्रकल्पासाठी लाभार्थींनी अर्जासोबत फोटो, ओळखपत्र, सातबारा, ८ अ, जागेबाबत संमत्तीपत्र, रहिवासी दाखला, अपत्य दाखला आदी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक सकपाळ यांनी दिली. (वार्ताहर)
लाभार्थींना मिळणार ५० टक्के अनुदान.
३ लाखाचा प्रकल्प; त्यामध्ये ४० शेळ्या व २ बोकड यांचा समावेश.
लाभार्थी निवडीमध्ये ४० टक्के लाभार्थी धनगर समाजातील असणे गरजेचे.
शेळ्या खरेदी समितीमार्फत खरेदी करण्यात येणार.