सरकारवर दबाव ठेवण्यासाठी नवे व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:25+5:302021-05-25T04:35:25+5:30

रत्नागिरी : चक्रीवादळग्रस्तांना त्यांच्या व्यथा मांडता याव्यात, सरकारवर एखादा दबावगट ठेवता यावा, यासाठी भाजपने ‘फिफ्थ पिलर’ हा उपक्रम सुरू ...

A new platform to put pressure on the government | सरकारवर दबाव ठेवण्यासाठी नवे व्यासपीठ

सरकारवर दबाव ठेवण्यासाठी नवे व्यासपीठ

रत्नागिरी : चक्रीवादळग्रस्तांना त्यांच्या व्यथा मांडता याव्यात, सरकारवर एखादा दबावगट ठेवता यावा, यासाठी भाजपने ‘फिफ्थ पिलर’ हा उपक्रम सुरू केला आहे. नुकसानग्रस्तांना त्यांच्या नुकसानीचे फोटो, व्हिडीओ पाठवण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्या सर्वांच्या आधारे सरकारकडे भरपाईसाठी पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भाजपच्या ‘फिफ्थ पिलर’ या फेसबुक पेजचे तसेच यू-ट्युब चॅनलचे ऑनलाइन उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्य उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी भाजप मीडिया सेलच्या समीर गुरव यांनी प्रथम या दोन माध्यमांद्वारे काय केले जाणार आहे, त्याची कार्यपद्धती काय आहे, याची माहिती दिली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन करताना न्याय मिळवण्यासाठीच हा अभिनव मार्ग असल्याचे सांगितले. पंचनामे योग्य पद्धतीने होत नाहीत. त्यासाठी फोटो काढताना किंवा व्हिडीओ करताना नेमके काय दाखवायचे, यासाठी निवृत्त तहसीलदार, तलाठी यांना साेबत घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दरवर्षी होणाऱ्या वादळांमुळे परंपरागत शेती, बागायती बंद करावी का, असे म्हणण्याइतकी वेळ आली आहे. त्यावर पर्याय शोधणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

गतवर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीची भरपाई अजून मिळालेली नाही. त्यातच तौक्ते चक्रीवादळाचे पंचनामेही योग्य पद्धतीने होत नसल्याची तक्रार अनेक लोकांनी आपल्या दौऱ्याप्रसंगी केली आहे, असे यावेळी फडणवीस यांनी सांगितले. लोकांच्या या तक्रारीची दखल घेऊन त्यांना न्याय मागता यावा, त्यांच्यासाठी भाजपने हे नवे व्यासपीठ खुले केले असल्याचे ते म्हणाले. राजकारण करण्यासाठी नाही तर लोकांच्या व्यथा मांडण्यासाठी हे व्यासपीठ आहे. भाजपने प्रत्येक आपत्तीप्रसंगी संवेदनशीलता दाखवली आहे. आताच्या वादळात कोकणात खूप मोठे नुकसान झाले आहे. मात्र, ते प्रत्यक्षात कागदावर येत नाही. त्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले.

वादळ जिथे जमिनीवर धडकते, तेथे खूप मोठे नुकसान होते. आताच्या वादळात गुजरातबाबतही तेच घडले आहे. त्यामुळे तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत जाहीर केली आहे. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ लावून गळा काढला जात असल्याची टीका त्यांनी केली.

...............

शिवसेनेला टोला

केंद्र सरकारने महाराष्ट्राला दीड हजार कोटी रुपयांची मदत द्यायलाच हवी, असे मत शिवसेनेच्या संजय राऊत यांनी मांडले आहे. मात्र, त्यांचीच सरकारी यंत्रणा नुकसान खूप कमी झाल्याचे दाखवत आहे. मग, मोठ्या रकमेची भरपाई मागायची तरी कशी, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला टोला हाणला.

Web Title: A new platform to put pressure on the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.